महिलांच्या चपलांत चिटोऱ्या टाकुन 'खाकी' वर्दीतला पोस्टमन व्हायचा पसार, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:37 PM2020-07-18T22:37:20+5:302020-07-18T22:38:22+5:30

अखेर ‘तो’ सापडला। आपलेच दात, आपलेच ओठ; कारवाई होणार का?

Putting chitory in women's slippers to become a postman in a khaki uniform | महिलांच्या चपलांत चिटोऱ्या टाकुन 'खाकी' वर्दीतला पोस्टमन व्हायचा पसार, मग...

महिलांच्या चपलांत चिटोऱ्या टाकुन 'खाकी' वर्दीतला पोस्टमन व्हायचा पसार, मग...

googlenewsNext

कऱ्हाड : स्मार्टफोनच्या जमान्यात चिठ्ठी कालबाह्य झालीय; पण कऱ्हाडच्या पोलीस वसाहतीत गत काही दिवसांपासून चक्क चिठ्ठ्या यायला लागल्या. इथे तिथे नव्हे तर चक्क महिलांच्या चपलांमध्ये या चिठ्ठ्या आढळायच्या. त्यामुळे तो ‘पोस्टमन’ कोण, याचीच चर्चा रंगलेली. शनिवारी सकाळी अखेर हा ‘सस्पेन्स’ संपला. चिठ्ठी पाठविणारा अलगद सापडला. आणि ‘खाकी’तल्या या पोस्टमनचा वसाहतीतच शिव्यांची लाखोली वाहत यथेच्छ ‘सत्कार’ही झाला.

कऱ्हाडच्या पोलीस वसाहतीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही हक्काचा निवारा मिळालाय. या वसाहतीत विविध फ्लॅटमध्ये शेकडो कुटुंबे वास्तव्यास आहेत. सुख, दु:खात ही पोलीस कुटुंबे एकमेकांना साथ देतात. मात्र, गत काही दिवसांपासून या पोलीस वसाहतीची झोप उडालेली. येथे आगंतुक चिठ्ठ्या यायला लागलेल्या. त्यामुळे महिलांमध्ये अनामिक भीती निर्माण झालेली. स्मार्टफोनच्या जमान्यात ‘चिठ्ठी’ हा खरंतर औत्सुक्याचा विषय; पण तो ‘पोस्टमन’ भलताच हुशार. मोबाईल नंबर हवा, असे लिहून तो त्या चिठ्ठ्या पाठवायचा. घरात नव्हे तर घराबाहेर काढलेल्या महिलांच्या चपलांमध्ये या चिठ्ठ्या सापडायच्या. त्यामुळे दिवसेंदिवस या चिठ्ठ्याची भीती महिलांच्या मनात घर करून राहिली होती. ज्यांना या चिठ्ठ्या सापडल्या त्या महिलांनी कुटुंबात याची कल्पना दिली. त्यामुळे संबंधितांचे कौटुंबिक वातावरणही ढवळून निघाले. संबंधित कुटूंबांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

काही दिवसांपासून याबाबत वसाहतीत जोरदार चर्चा सुरू होती. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करीत असेल, असे समजून सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत राहिला. आणि वसाहतीमधील कुटुंबांना संताप अनावर झाला. या पोस्टमनला शोधायचं कसं, याचा विचार सुरू असतानाच एकाने त्यावर मार्ग काढला. घराच्या पोर्चमध्ये त्याने कोणालाही माहिती न होता कॅमेरा बसविला. आणि अखेर तो ‘चिठ्ठीबॉय’ अलगद सापडला. शनिवारी सकाळी या प्रकाराने वसाहतीत भलताच गोंधळ उडाला. चपलांमध्ये चिठ्ठी ठेवणाऱ्याला अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले. शिव्यांची लाखोली वाहत त्याचा यथेच्छ सत्कारही झाला. आणि सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असे म्हणणाऱ्या त्या ‘खाकी’तल्या रोमिओला पळता भुई थोडी झाली.
वसाहतीत घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित कुटुंबे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. झालेल्या प्रकाराने संबंधित कुटूंब पुरते हादरून गेले आहे. मात्र, त्यातही ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ अशी समजूत घालून ‘कशाला तक्रार करताय’असा सल्ला काहीजणांकडून संबंधितांना दिला जातोय. त्यामुळे काय‘द्याची’ भाषा बोलणाऱ्या त्या चिठ्ठीवाल्यावर कारवाई होणार की मध्यस्थी घालून यावर पडदा टाकला जाणार, हा प्रश्न आहे.

साहेब... हे वागणं बरं नव्हं!
पोलीस वसाहतीत ज्याने हा चिठ्ठीचा ‘खेळ’ केला तो साहेबांचा ‘खास’ माणूस. पडत्या फळाची आज्ञा घेत साहेबांच्या मर्जीने काय‘द्याची’ भाषा तो नेहमीच बोलतो. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याचा भलताच रुबाब. फिर्यादी, आरोपी, मध्यस्थी एवढंच नव्हे तर अगदी पोलीस कर्मचाºयांमध्येही त्याचा नेहमीच बोलबोला; पण वसाहतीत घडलेला हा प्रकार निश्चितच निंदनीय आणि वसाहतीच्या शिस्तीला गालबोट लावणारा आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार की ‘साहेब’ पडदा टाकायला मदत करणार, याची उत्सुकता आहे. 

Web Title: Putting chitory in women's slippers to become a postman in a khaki uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.