चतुर्भुज झाला अखेर चतुर्भुज,लाचलुचपतची शिरवळ येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:04 AM2020-01-17T11:04:38+5:302020-01-17T11:06:13+5:30
शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद याला २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
शिरवळ /सातारा : शिरवळ पोलीस स्टेशनमधील वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज नारायण चव्हाण-काशीद (वय ५७, सध्या रा. शिरवळ, ता.खंडाळा, मूळ रा.कोळकी ता.फलटण ) याला खाजगी चारचाकी गाडीवर अवैध वाहतुकीची कारवाई न करण्याकरीता २ हजार रुपये लाचेची मागणी करत स्विकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चतुर्भुजच चतुर्भुज झाल्याने शिरवळमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज चव्हाण - काशीद येत्या चार महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार होता.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी खाजगी चारचाकी गादीवर अवैध प्रवाशी वाहतुकीची कारवाई करतो असे सांगून संबंधित तक्रादाराकडे शिरवळ पोलीस स्टेशनचा वाहतूक विभागाचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चतुर्भुज चव्हाण-काशीद याने लाचेची मागणी केली होती.
त्यानुसार तडजोडीअंती २ हजार रुपयांमध्ये तडजोड करत शिरवळ येथील एका खाजगी रुग्नालयालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये २ हजार रुपये स्विकारताना चतुर्भुज चव्हाण-काशीद याला सातारा येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, शिरवळ येथील चतुर्भुज चव्हाण-काशीद याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ची कारवाई झाल्यानंतर विविध चर्चेला उधाण आले असून चतुर्भुज काशीद-चव्हाण याला सातारा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे शिरवळ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईमध्ये पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक शिर्के, पोलीस हवालदार संजय साळुंखे, विशाल खरात,तुषार भोसले, निलेश येवले यांनी भाग घेतला.