दर्जेदार लोकेशन अन् अल्प मोबदल्यात कलाकारही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:28+5:302021-01-13T05:43:28+5:30
सातारा : निसर्गसमृद्ध सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटण सध्या चित्रकीरणाचे हॅपनिंग डेस्टिनेशन ठरत आहे. दर्जेदार लोकेशन आणि अल्प दरात ...
सातारा : निसर्गसमृद्ध सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटण सध्या चित्रकीरणाचे हॅपनिंग डेस्टिनेशन ठरत आहे. दर्जेदार लोकेशन आणि अल्प दरात उपलब्ध होणारे स्थानिक कलाकार यामुळे चित्रीकरणासाठी पसंती मिळात आहे.
सातारा जिल्ह्यात निसर्गाबरोबरच दुर्ग आणि धार्मिकस्थळंही चित्रीकरणासाठी सिल्व्हर स्क्रीनलाही भुरळ पाडत आहेत. जिल्ह्यातील वाई तालुक्यात दोन आणि फलटण तालुक्यात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. वाईत सुरू असलेल्या चित्रीकरणात ७० टक्के स्थानिकांना संधी दिली आहे. तर फलटणमध्ये बहुतांश कलाकार हे मुंबईचेच आहेत.
साताऱ्यापासून पुणे आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी सहज सोपी आहे. याबरोबरच महानगरांच्या तुलनेत मालिका बनविण्यासाठी खर्चही कमी होतो. विशेष म्हणजे दर्जेदार स्थानिक घेऊन उत्तम मालिका आकाराला येत असल्याने बहुतांश मालिकांमध्ये स्थानिकांनाच संधी दिली जाते. यामुळे लोकल कलाकार ग्लोबल होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसते.
चौकट :
आर्थिक चलनवलनाला गती!
सातारा जिल्ह्याला पर्यटनाबरोबरच चित्रकीरणाने आर्थिक गती दिली आहे. ग्रामीण भागात खोल्या भाड्याने देण्यापासून त्यांच्या जेवणाची सोय करणे, चित्रीकरणासाठी आवश्यक साधनसामग्रीची खरेदीही स्थानिक बाजारातून होत आहे. चित्रीकरण सुरू असल्यामुळे गावात पर्यटकांचा ओढा वाढतो. परिणामी, आर्थिक चलनवलनालाही गती मिळते.
कोट :
सातारा जिल्ह्यात चित्रीकरण करण्याला सर्वाधिक पसंती मिळते ते लोकेशनमुळे. येथे चित्रीकरण करताना फार सेट उभे करायची गरज पडत नाही. ऐतिहासिक वाडे, उत्तम वसलेले गाव तयारच मिळत असल्याने चित्रीकरणचा खर्च वाचतो.
- बाळकृष्ण शिंदे, अभिनेते