सातारा जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हेवर प्रश्नचिन्ह?, ९५ लाखांचा खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:24 PM2023-12-09T19:24:33+5:302023-12-09T19:25:30+5:30

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट..

Question mark on disability survey in Satara district | सातारा जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हेवर प्रश्नचिन्ह?, ९५ लाखांचा खर्च 

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हेवर प्रश्नचिन्ह?, ९५ लाखांचा खर्च 

सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सर्व्हे करुन अहवालही प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे ८२ हजार दिव्यांग दिसून आले असलेतरी सर्व्हेंबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, एका संस्थेने हे काम केले असलेतरी एक दिव्यांग शोधण्यासाठी शंभरच्यावर खर्च झाला आहे. परिणामी सर्व्हेवर एकूण ९५ लाखांचा खर्च झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्व्हे खरोखरच संबंधितांपर्यंत पोहोचून झाला का याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्यांना योजनांचा लाभ व्यवस्थित मिळावा, अडचणी येऊ नयेत यासाठी दिव्यांग बांधवांचा सर्व्हे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत काम करण्यात आले. यासाठी जानेवारी महिन्यात टेंडर प्रक्रियाही पार पडली. हे टेंडर राज्यातील एका संस्थेने घेतले. त्यांना जिल्ह्यातील दिव्यांग बांधव शोधून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली. 

टेंडरनंतर कागदाेपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित संस्थेचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू झाले. या संस्थेने दिव्यांग शोधण्याची मोहीम पूर्ण करुन तीन महिन्यात म्हणजे जूनमध्ये जिल्हा परिषदेला अहवालही सादर केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात ८२ हजार दिव्यांग बांधव दिसून आले. हे करताना संबंधित संस्थेला एक दिव्यांग शोधण्यासाठी १०० रुपयांहून अधिक रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार संस्थेचे दिव्यांग सर्व्हेचे बील सुमारे ९५ लाख झाल्याचीही माहिती मिळत आहे. पण, हा सर्व्हे योग्य आणि दिव्यांगांच्या दारी जाऊन संस्थेने केला का ?. त्यांच्याबरोबर दिव्यांगाची तपासणी करणारे कोणी होते का ? याविषयी प्रश्न उभा राहिला आहे. काही संघटनांनी तर सर्व्हे व्यवस्थित झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह आहे.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट..

जिल्ह्यातील दिव्यांग सर्व्हे राज्यात सर्वत्र झालेला नाही. पण, सातारा जिल्ह्याततरी झाला आहे. हा सर्व्हे होण्यासाठी तत्कालिन एका जिल्हाधिकाऱ्यांना इंटरेस्ट होता, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व्हेविषयी शंका येण्यास वाव असून त्याप्रकारे चर्चाही सुरू झाली आहे.

संस्थेने दिव्यांग कसे ठरवले..

संस्थेने हा सर्व्हे करताना कोणाला बरोबर घेऊन केला. दिव्यांग बांधवांपर्यंत कसे पोहोचले याविषयीही चर्चा सुरू झाली आहे. कारण, जिल्ह्यात अजून सर्व दिव्यांग बांधवांना यूडीआयडी ओळखपत्र मिळालेले नाही. त्यामुळे संस्थेने कोणत्या आधारावर आणि त्यांच्याबरोबर सर्व्हेंसाठी कोण बरोबर होते याविषयीही जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Question mark on disability survey in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.