यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

By admin | Published: October 27, 2014 09:50 PM2014-10-27T21:50:52+5:302014-10-27T23:43:07+5:30

दुपारी पाऊस-रात्री थंडी : वादळी पावसाचा धोका टळला; वातावरण निवळल्यानंतर वाढणार थंडी

Questioner ... Can I take a raincoat sweater? | यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

Next

सातारा : गेल्या चार दिवसांपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, मधूनच पावसाची भुरभूर आणि हवेत कमालीचा वाढलेला गारठा हा बदल अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे झाल्याचे सातारा हवामान विभागाकडून सांगण्यात आले. अशा संमिश्र वातावरणामुळे स्वेटर घ्यावा की रेनकोट, अशी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामस्वरूप आपल्याकडे वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र, अरबी समुद्रातील वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे मोठा धोका टळला आहे. मात्र, अशा स्थितीमुळेच आपल्याकडे अचानक वातावरणात बदल झाला आहे. गेल्या चार दिवसात तापमान १८ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत आले होते. त्यामुळे आॅक्टोबर हिटने घामेघूम होत असतानाच अचानक निर्माण झालेल्या थंडीच्या लाटेमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. थंडी, ताप, खोकला अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. आज सोमवार, दि. २७ आॅक्टोबर २०१४ रोजी तापमान २४.६ ते १८.५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.
गेल्यावर्षी याच दिवशी कमाल ३३ तर किमान २२ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी कमाल ९ तर किमान ४ अंश सेल्सियसने तापमान कमी झाले आहे. दि. २६ रोजी कमाल २०.८ तर किमान १५.९ तापमान होते. अजून दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
गारठा कमीच...
गेल्या चार दिवसात वातावरणात बदल झाला असला तरी सोमवारचे किमान तापमान हे १८.५ अंश सेल्सियस होते. हे तापमान नेहमीसारखेच आहे. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे गारठा जास्त जाणवत असल्याचे तिखे यांनी सांगितले.

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. आपल्याकडे वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याने सूचना दिल्या होत्या. मात्र, हे वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे तो धोका टळला आहे. मात्र, अजून दोन दिवस तरी ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर थंडी वाढणार आहे.
- व्ही. आर. तिखे,
तापमान कर्मचारी,
सातारा

नागरिकांमध्ये संभ्रमावस्था...
गेल्या चार दिवसांत वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ढग दाटून अंधारून येत असल्यामुळे मोठा पाऊस पडतो की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांना आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना अंगात स्वेटर घालावा की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.

भुरभुर पाऊस
पिकांसाठी घातक
नागरिक आॅक्टोबर हिटने हैराण असतानाच अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणाबरोबरच दिवसा आणि रात्रीही बोचरी थंडी पडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा प्रतिकूल परिणाम झालेला जाणवत आहे. पावसाची भुरभूर ही पिकांसाठी रोगट वातावरण निर्माण करणारी असल्यामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.

Web Title: Questioner ... Can I take a raincoat sweater?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.