कोरोना सेंटरच्या बाहेर पुन्हा टपऱ्यांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:42+5:302021-03-27T04:40:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या गाड्या व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाने कारवाई करूनही येथील विक्रेत्यांना कोरोनाचे तूसभरही गांभीर्य नसल्याचे येथील गर्दीवरून दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयाची कमतरता भासू लागली. त्यामुळे राज्य शासनाने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत सर्व सेवा सुविधांनी युक्त असे जम्बो कोरोना सेंटर सुरू केले. गतवर्षी हे सेंटर सुरू झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून संग्रहालयाच्या आवारातील सर्व टपर्या व हातगाड्या हटविण्यात आल्या. मात्र काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली.
कोरोना सेंटरपासून केवळ शंभर मीटर अंतरावरच खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग वाढू लागली आहे. शेजारी बसस्थानक असल्याने या हातगाड्यांवर प्रवाशांची सतत वर्दळ सुरू असते. या गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिकेला कोरोना सेंटरपर्यंत जावे लागते.
कोरोना सेंटर हाकेच्या अंतरावर असून, सुद्धा येथील हातगाडीधारक, टपरी चालक व नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर करणाऱ्यांची संख्याही जेमतेमच आहे. हातगाड्यांची वाढती रांग व येथे होणारी गर्दी धोक्याची-घंटा देऊ लागली आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील टपऱ्या इतरत्र स्थलांतरित करणे गरजेचे बनले आहे.
फोटो : मेल
साताऱ्यातील जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात खाद्यपदार्थांच्या गाड्या व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. (छाया : जावेद खान)