रब्बी हंगामात धान्याचा टक्का वाढला -कोरडवाहू शेतकऱ्यांना अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 09:19 PM2019-02-22T21:19:09+5:302019-02-22T21:19:38+5:30
पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात शाळूसह रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची धांदल सुरू झाली आहे. चालू वर्षी थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात शाळूसह रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची धांदल सुरू झाली आहे. चालू वर्षी थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे शाळू पिकासह रब्बी हंगामातील कोणत्याही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे उत्पादन चांगले निघण्याची अपेक्षा आहे. शाळूचा कडबा चांगला असून, कडब्याला ऊस दरापेक्षा जास्त पैसे मिळतील, अशी शक्यता शेतकºयांतून व्यक्त होत आहे.
रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा, मका आदी पिके उरूल, विहे, मारुल हवेली, नवारस्तासह मल्हारपेठ भागात दर्जेदार आहेत. थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे कोणत्याही पिकावर रोग-किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. टोकण व पेरणी केलेल्या गहू पिकास चालूवर्षी सर्वात जास्त उत्पन्न मिळेल, असे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले. कोयना नदीचा हिरवा पट्टा म्हणून ओळख असणाºया मल्हारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतले जाते. तर डोंगरालगत असणाºया उरूल, मारुल हवेली व नवारस्ता परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्याची सोय नसणाºया क्षेत्रात शाळू पीक घेतले जाते.
पावसाळ्यानंतर रब्बी हंगामातील शाळू पिकाच्या पेरणी व उगवणीस वातावरण चांगले होते.
गत दोन महिन्यांपासून शेतकरी दिवस उजाडण्यापूर्वी शाळू पिकांची पाखरापासून राखण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. पंधरा दिवसांपासून वैल वारा सुटल्यामुळे शाळू काढणीस लवकर आला आहे. आठ दिवसापांसून पहाटे लवकर जाऊन सूर्य वर येईपर्यंत शेतात शाळू काढण्याचे काम सुरू आहे. ऊस तोडणी चालू असल्यामुळे ओल्या चाºयाचा प्रश्न सध्यातरी नाही. मात्र उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालल्यामुळे चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती शेतकºयांतून व्यक्त होत आहे. पहिल्या वर्षी केलेल्या लागणीची ऊस तोडणी पूर्ण झाल्या असून, खोडवे ऊस तोडणी सुरू आहे. मात्र त्याचे ऊस वाडे दर्जेदार नसल्यामुळे चाºयाचा प्रश्न हळूहळू जाणवू लागला आहे. चालूवर्षी हिरव्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊस असून, शाळू पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे.
डोंगरालगत असणाºया ठराविक भागात कोयना नदीचे पाणी पोहोचत नसलेल्या ठिकाणी पाण्याविना येणारे शाळू पीक घेतले जाते. तेथे गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी शाळू, गहू पिके काढणी, खुडणी, मळणीसह वाळविण्याचे काम सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. धान्याचे उत्पादन वाढणार असल्यामुळे सध्या शेतकºयांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
शेतकºयांसमोर मजुरांचा गंभीर प्रश्न
प्रत्येक शेतकºयाची शाळू व गहू काढणीची सुगी सुरू असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. सकाळी उठल्याबरोबर शेतकºयांना कामासाठी मजुरांच्या दरात उभे राहावे लागत आहे. मजूर लावून शेती करणे परवडत नाही. मात्र पर्याय नसणारे जास्त क्षेत्र असणाºया शेतकºयांना मजुरांच्याकडे फेरे मारावे लागत आहेत. मजूर कमी असल्यामुळे शाळू उपटून काढणे, एक कट्टी व दोन कट्टी कडबा पेंडी बांधणीचा दरही वाढला आहे.
ग्रामीण भागात उन्हाळ्यासाठी जनावरांना लागणारा सुका चारा गोळा करण्याची गडबड सुरू आहे. ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ओले वाडे विकत घेऊन सुकविणे. तर डोंगरातील वाळक्या गवताच्या पेंड्या, शाळू कडबा, ओली मका विकत घेऊन परड्यात गंजी लावण्याचे काम ग्रामीण भागात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
गहू पिकासही उतारा चांगला
चालू वर्षी शाळू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे उत्पादनात वाढ होईल. गहू पिकास उतारा चांगला असून, थंडीमुळे प्रत्येक शेतकºयास जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
चालूवर्षी थंडीमुळे शाळू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव जाणवला नाही. मात्र दोन महिने पाखराकडे खडा पहारा करावा लागला. शाळू पीक चांगले असून, उत्पन्न चांगले मिळणार आहे. तसेच उसाच्या टनापेक्षा चालू वर्षी कडब्याच्या शेकडा पेंडीला जास्त दर मिळेल. थंडीमुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके चांगली आहेत.
- सतीश कदम, शेडगेवाडी-विहे