खंडणीप्रकरणी गुंड सल्या चेप्याला अटक
By admin | Published: September 2, 2015 10:58 PM2015-09-02T22:58:44+5:302015-09-02T23:38:23+5:30
सांगली पोलिसांची कारवाई : ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्याकडे मागितले पाच लाख
सांगली : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार मुश्ताकअली मुनवरअली रंगरेज यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन महिन्यांनंतर गुंड सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या वय ४३, रा कार्वे नाका, कऱ्हाड) याला बुधवारी सकाळी संजयनगर पोलिसांनी अटक केली. सल्याला बंदूकधारी पोलिसांच्या बंदोबस्तात दुपारी सांगलीत आणण्यात आले. याप्रकरणी गुंड निसार नगारजी (४५), आयुब बारगीर (३६, दोघे रा. खणभाग) व आयुब पटेल (३८, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, सांगली) या तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. संशयित निसार नगारजी, आयुब बारगीर व आयुब पटेल यांची रंगरेज यांच्याशी ओळख होती. २५ मे रोजी रात्री साडेदहा वाजता तिघे रंगरेज यांच्या घरी गेले. ओळख असल्याने रंगरेज यांनी त्यांना घरात घेतले. त्यानंतर संशयितांनी (पान १ वरून) ‘कराडसे सलीम बात कर रहा है, बोलो’, असे म्हणून रंगेरज यांच्याकडे मोबाईल दिला. सलीमनामक व्यक्तीने ‘कराडसे सलीम बोल रहा हूँ, पाच लाख रुपये मेरे आदमीके पास दो’, असे सांगितले. रंगरेज यांनी ‘कसले पैसे, कशासाठी द्यायचे’, अशी विचारणा करताच, सलीमने मोबाइल बंद केला. त्यानंतर रंगरेज यांनी संशयितांकडे ‘हा काय प्रकार आहे?, हा सलीम कोण आहे?’, अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी ‘आम्हाला पैशांची गरज आहे, तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला व तुमच्या कुटुंबास जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे रंगरेज घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयितांनी पलायन केले होते.त्यानंतर रंगरेज यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी निसार नगारजीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ज्या सलीमनामक व्यक्तीने धमकी दिली होती, तो कऱ्हाडमधील गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या असावा, असा अंदाज पोलिसांचा होता. काही दिवसांनंतर पोलिसांनी निसार नगारजी, आयुब बारगीर व आयुब पटेल या तिघांना अटक केली होती. अटकेच्या भीतीने सल्या चेप्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने ४ जूनपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. त्यानंतर सल्याला अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बुधवारी संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र डोंगरे, सहायक निरीक्षक बाबासाहेब कोळी आणि पथकाने त्याला कऱ्हाडमध्ये अटक केली. सल्यावर दोन वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाला होता. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून आहे. पोलिसांनी त्याला त्याच्याच मोटारीतून (एमएच ५०, १७८६) सांगलीत आणले.
दुपारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शासकीय रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)
सल्या बिनधास्त, पोलीस तणावात!
सल्या चेप्यावर गोळीबार झाल्याने त्याचा कमरेखालचा भाग लुळा पडला आहे. त्यामुळे त्याला त्याच्याच वाहनातून सांगलीत आणण्यात आले. पुढे पोलीस गाडी आणि मागे सल्याचे वाहन, असा ताफा शासकीय रुग्णालयाच्या आवारात दाखल होताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णालयाच्या पोर्चमध्येच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयाच्या आवारात तैनात करण्यात आला होता. सल्या गाडीत बसून चालकाशी बिनधास्त बोलत होता, तर बाहेर मात्र पोलिसांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता.
सल्यावर ३४ गंभीर गुन्हे
गुंड सल्या चेप्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत खून, मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे ३४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. कऱ्हाडमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दुहेरी खून प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीत आतापर्यंत त्याच्यावर दोन गुन्हे आहेत. येथील नगरसेवक विश्वनाथ ऊर्फ दाद्या सावंत याच्या खून प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.