म्हावशीच्या ग्रामसभेत राडा

By admin | Published: October 2, 2015 11:30 PM2015-10-02T23:30:42+5:302015-10-02T23:33:29+5:30

महिला सरपंचांना शिवीगाळ : उपसरपंचांसह आठ जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Rada in the Gram Sabha of the village | म्हावशीच्या ग्रामसभेत राडा

म्हावशीच्या ग्रामसभेत राडा

Next

पाटण : पाटण शहरानजीक असणाऱ्या म्हावशी या सुमारे सहा हजार लोकवस्तीच्या मोठ्या गावात गांधीजयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत जोरदार राडा झाला. दारू दुकानाला परवाना दिल्याच्या विषयावरून झालेल्या खडाजंगीत महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करून त्यांना जातिवाचक शिवीगाळ आणि दमदाटी, तसेच त्यांच्या पतीस ग्रामसभेतच मारहाण केल्याची तक्रार पाटण पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी एकूण आठ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच निशा चव्हाण, ग्रामसेवक देवानंद निकम आणि अन्य एका सदस्याने देशी दारूच्या दुकानास परवानगी देण्याचा ठराव केला, असा आरोप उपसरपंच शंकर घाडगे यांनी यापूर्वी केला होता. त्याचे पडसाद शुक्रवारी, दोन आॅक्टोबरला गांधीजयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत उमटले. हा विषय सभेत पुन्हा ऐरणीवर आला, त्यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच निशाच चव्हाण आणि ग्रामसेवक निकम यांना निलंबित करण्याची मागणी केली. बोगस प्रोसीडिंग तयार करून दारूदुकानाला परवानगी देण्यात आल्याचा आरोप केला. गावच्या लोकांना अंधारात ठेवल्याचा आरोप होताच मोठी वादावादी झाली.
सहायक निरीक्षक हणमंत गायकवाड व पोलीस कर्मचारी ग्रामसभेत पोहोचले आणि पुढील संघर्ष टळला. दरम्यान, निशा चव्हाण व त्यांचे पती लालासाहेब चव्हाण यांना मारहाण, शिवीगाळ, सरपंचांशी असभ्य वर्तन केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार उपसरपंच शंकर घाडगे, रामचंद्र घाडगे, लक्ष्मण घाडगे, रमेश मोळावडे, सुनील मोळावडे, दीपक घाडगे, चंद्रकांत घाडगे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाति-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता घाडगे यांच्यावरही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rada in the Gram Sabha of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.