धरणग्रस्तांचा नागेवाडीत राडा
By admin | Published: February 7, 2016 12:44 AM2016-02-07T00:44:52+5:302016-02-07T00:44:52+5:30
आंदोलकांची धरपकड : २३ अटकेत, दगडफेकीत जेसीबी चालक जखमी
बावधन : वाई तालुक्यातील नागेवाडी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासन व शेतकरी यांच्यात तोडगा न निघाल्याने शनिवारी धरणग्रस्तांनी नागेवाडी धरणाच्या कॅनॉलचे काम बंद पाडले. यावेळी धरणग्रस्त व पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यानंतर पोलिसांनी २३ धरणग्रस्तांना अटक करून कालव्याच्या कामास पुन्हा सुरुवात केली़ यावेळी एका धरणग्रस्त शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला़, तर काहींनी जेसीबी चालकावर दगडफेक केली. यामध्ये जेसीबी चालक जखमी झाला.दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात नागेवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे खाते व महसूल विभाग यांनी सयुंक्तरीत्या बैठकीचे आयोजन केले होते़ यामध्ये कोणताही निर्णायक तोडगा निघाला नाही़
नागेवाडी धरणाच्या प्रकल्पाला १५ वर्षे पूर्ण झाली असून, आजतागायत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे़ पाटबंधारे खात्याने नागेवाडी धरणग्रस्तांना पुनर्वसन प्रक्रियेविषयी योग्य मार्गदर्शन न केल्याने पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरित राहिला़ मध्यंतरीच्या काळात खास बाब म्हणून सहा शेतकऱ्यांचे फक्त कागदोपत्री पुनर्वसन झाल्याचा दाखला पाटबंधारे खात्याने संबंधित सहा शेतकऱ्यांना देण्यात आला. प्रत्यक्ष पुनर्वसन करण्यात आलेच नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच गेला़ शनिवारी त्याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले. या कारवाईत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)