मलकापुरात भररस्त्यात दोन गटांत राडा वाहतूक ठप्प; काहीकाळ तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:24 PM2017-12-06T23:24:21+5:302017-12-06T23:27:24+5:30
मलकापूर : येथील शिवछावा चौकात युवकांच्या दोन गटांत राडा झाला. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मलकापूर : येथील शिवछावा चौकात युवकांच्या दोन गटांत राडा झाला. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, भर रस्त्यातच हाणामारी झाल्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. युवकांच्या गटाने रस्त्यावरच धिंगाणा घातल्यामुळे अर्धा तास वाहतूक कोंडीही झाली होती.
मलकापुरात गुन्हेगारी रोखण्यासाठी नगरपंचायतीने आगाशिवनगर येथे झेडपी कॉलनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवाजी चौक, कन्याशाळा परिसर अशा सहा ठिकाणी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चौकाचौकांत होणाºया गुन्हेगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र आगाशिवनगरसह मलकापूर परिसरात युवकांच्या दोन गटांत बाचाबाची व हाणामारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. युवकांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरून मारामारी होत असते. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत युवक पसार होतात. त्यामुळे अशा घटनांची कोठेही नोंद होत नाही. परिणामी सध्या युवकांच्यात कसलीही भीती राहिली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेकवेळा गाडी आडवी मारल्याच्या किरकोळ कारणावरून वारंवार बाचाबाची व किरकोळ हाणामारी होतच असते. अशा पद्धतीने मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवछावा चौकात दोन चारचाकी गाड्यांतून युवकांचे दोन गट आमनेसामने आले. काही समजण्यापूर्वीच जोरदार हाणामारी सुरू झाली. पंधरा ते वीस मिनिटे राडा करून संबंधित युवकांचे दोन गट आपापल्या गाडीत बसून पसार झाले.
भर रस्त्यातच घडत असलेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. तर चौकात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी हाणामारी कोणाची व कशासाठी? हे कोणालाच समजले नाही. महामार्ग पोलिस चौकीशेजारीच हाणामारी होत असताना एकही पोलिस कर्मचारी चौकाकडे फिरकले नाहीत. यावेळी चौकात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती
बाहेरचे भांडण... मलकापुरात राडा
व्यवसाय व नोकरी निमित्ताने शहरात येणाºयांची व जाणाºयांची संख्या मोठी आहे. अनेकवेळा परगावात झालेल्या भांडणाचे मलकापुरात उट्टे काढण्याच्या घटनाच वारंवार घडतात. मंगळवारी रात्री शिवछावा चौकात घडलेला प्रकारही त्यापैकीच एक असावा, अशी घटनास्थळी चर्चा होती.
रुग्णवाहिकेच्या सायरनमुळे भांडण थांबले
मंगळवारी रात्री दोन चारचाकी गाड्यांतून आलेल्या युवकांच्या गटात तुंबळ हाणामारी सुरू होती. रस्त्यातच राडा सुरू असल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. त्याचवेळी ढेबेवाडीकडून रुग्णालयाकडे जाणाºया रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून युवकांनी हाणामारी थांबविली आणि ते निघून गेले.