रहिमतपूर परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:43+5:302021-06-29T04:26:43+5:30
रहिमतपूरसह परिसरातील गावांतील पेरणी ऐंशी टक्के पूर्ण झाली आहे. शिल्लक क्षेत्रातील पेरणीची लगबग सुरू आहे. आडसाली उसाची लागण व ...
रहिमतपूरसह परिसरातील गावांतील पेरणी ऐंशी टक्के पूर्ण झाली आहे. शिल्लक क्षेत्रातील पेरणीची लगबग सुरू आहे. आडसाली उसाची लागण व आले लागवडी अंतिम टप्प्यात आहेत. गेले काही दिवस समाधानकारक पाऊस न झाल्याने व तापमान वाढल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. अनेक शेतकऱ्यांना उसाला विंधनविहिरीवरून पाणी सुरू केले होते. अशा परिस्थितीतच सोमवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. तीन वाजण्याच्या सुमारास देवदरी डोंगररांगेवर पावसाच्या दमदार सरी कोसळू लागल्या. काही वेळातच अंभेरी, अपशिंगे, साप, पिंपरी, रहिमतपूरसह परिसरातील गावाबरोबरच सातारा तालुक्यातील तासगावपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही वेळातच शेतातून पाण्याचे लोट बाहेर पडले. बघता बघता जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसू लागले. काही आडसाली उसाचे फड पावसाच्या तडाख्याने कोलमडले आहेत. दरम्यान, या दमदार पावसाने शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केले जात आहे.