रहिमतपूरमध्ये फौजदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:46 PM2018-11-18T22:46:14+5:302018-11-18T22:46:19+5:30

रहिमतपूर : हॉटेलमालकावर कारवाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी भरधाव दुचाकी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली. रहिमतपूर ...

In Rahimatpur, an attempt was made to kill the soldier | रहिमतपूरमध्ये फौजदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न

रहिमतपूरमध्ये फौजदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

रहिमतपूर : हॉटेलमालकावर कारवाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी भरधाव दुचाकी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली. रहिमतपूर येथे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले.
याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी रणजित अप्पासाहेब क्षीरसागर (वय २९), नितीन किसन भोसले (३९, दोघे रा. धामणेर, ता. कोरेगाव) यांना अटक केली. रहिमतपूरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बाळनाथ जगदाळे (२९, मूळ रा. हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रहिमतपूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हजेरी संपल्यानंतर जगदाळे घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोघे पोलीस ठाण्यात आले. त्या दोघांनी ‘तुम्ही कोण आहात? तुमचा ड्रेस कुठे आहे, तुमचा बक्कल नंबर काय?’ असे विचारत, ‘आम्हाला हॉटेलमालकाने खोटे बिल दिले आहे. तुम्ही आता लगेच आमच्याबरोबर चला. नाही तर तुम्हाला खांद्यावरून घेऊन जातो,’ असे सांगितले.
त्या दोघांना जगदाळे यांनी ‘आधी तक्रार द्या, त्यानंतर कारवाई केली जाईल,’ असे सांगितले. त्यानंतर ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान, चांदणी चौकात लोकांची गर्दी झाली असल्याची माहिती मिळताच जगदाळे दुचाकी (एमएच ४५ जे ३०४५)वरून ठाण्याच्या पाठीमागील असलेल्या गेटमधून बाहेर पडले.
जगदाळे दुचाकीवरून चांदणी चौकाकडे जात असताना रणजित क्षीरसागर व नितीन भोसले हे पाठीमागून भरधाव वेगात दुचाकी (एमएच ११ बीएन ३६) वरून आले. त्यांनी जगदाळे यांना जिवे मारण्याचा उद्देशाने दुचाकीने जोरात ठोकर दिली. यात जगदाळे गंभीर जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर त्या दोघांनी जगदाळे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.
याप्रकरणी रात्री उशिरा रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळी दोघांना अटक करून कोरेगाव न्यायालयात हजर केले. दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करीत आहेत.

Web Title: In Rahimatpur, an attempt was made to kill the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.