तुकोबारायांच्या सेवेत रहिमतपूरची बैलजोडी!
By admin | Published: July 11, 2016 12:57 AM2016-07-11T00:57:44+5:302016-07-11T00:57:44+5:30
पालखी ओढण्याचा मान : हणमंतराव जाधव यांच्या बिर्ज्या-सोन्याकडून संतसेवा
रहिमतपूर : विठुरायांच्या दर्शनाची आस मनात बाळगून राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी म्हणून असंख्य माणसं धडपडत असतात. ज्यांना वारी शक्य नाही, असे लोक संतांची सेवा करतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान चक्क रहिमतपूरमधील बिर्ज्या-सोन्या या बैलजोडीला मिळाला आहे.
रहिमतपूरमधील विठ्ठलाचे वारकरी शेतकरी हणमंत बाजीराव जाधव हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आपल्या बैलांकडून संतसेवा घडावी, असे त्यांना अनेकवेळा वाटत होते. त्यानुसार त्यांनी माहिती घेऊन बैलजोडीचे छायाचित्रे देहू येथील तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टला इंटरनेटद्वारे पाठविले. या फोटोवरून देवस्थानच्या विश्वस्तांनी रहितमपूरला येऊन बैलांची पाहणी केली.
हणमंत जाधव यांच्या बिर्ज्या आणि सोन्याला पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून यवत मुक्कामापर्यंत पालखी ओढण्याचा मान दिला.
जाधव यांच्या बिर्ज्या, सोन्याच्या रूपाने रहिमतपूरमधील पहिल्याच बैलजोडींना संतसेवेचा मान मिळाला आहे. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हे बैलजोड आता गावी आली असून, महिलांनी त्यांचे पूजन केले आहे. (वार्ताहर)