रहिमतपूरचा वनपाल लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:41 PM2020-06-19T15:41:18+5:302020-06-19T15:42:58+5:30
सातारा : सागवान झाडांच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच घेताना रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील वनपाल संदीप ...
सातारा : सागवान झाडांच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ५७ हजार ४०० रुपयांची लाच घेताना रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील वनपाल संदीप प्रकाश जोशी याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी रात्री आठच्या सुमारास रहिमतपूर येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदाराने सागवानाची झाडे तोडली होती. त्यासाठी त्याला वाहतुकीसाठी परवानगी हवी होती. यासाठी तक्रादार रहिमतपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी वनपान संदीप जोशी याने तक्रारदाराकडे ५७ हजार ४०० रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदाराने याची लेखी तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री रहिमतपूर येथे जोशी याला ५७ हजार ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.