देशमुखनगर येथील देशीदारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:51+5:302021-05-29T04:28:51+5:30
नागठाणे : देशमुखनगर (ता. सातारा) येथील चोरून सुरू असलेल्या दारूविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा टाकून कारवाई ...
नागठाणे : देशमुखनगर (ता. सातारा) येथील चोरून सुरू असलेल्या दारूविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी तेथून ५४,७२० रुपये किमतीच्या देशी दारूचे १९ बॉक्स जप्त केले.
याप्रकरणी शकिला गुलाब मुलाणी (वय ६२) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी देशमुखनगर येथे एक महिला चोरून दारूविक्री करीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, हवालदार राजू शिखरे, उत्तम गायकवाड, अमित पवार, महिला पोलीस तेजस्विनी जाधव व चालक धनंजय जाधव हे देशमुखनगर येथे पोहोचले. यावेळी रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाजवळ एक महिला बॉक्स घेऊन बसलेली आढळली. पोलिसांनी बॉक्स तपासला असता त्यात देशी दारूच्या बाटल्या आढळल्या.
यावेळी पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता त्यांना पलंगाखाली कपड्याने झाकून ठेवलेले आणखी १८ देशी दारूचे बॉक्स आढळले. पोलिसांनी या १९ बॉक्समधील ५४,७२० रुपये किमतीच्या ९१२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी शकिला गुलाब मुलाणी हिच्याविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.