वडजल येथे जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:20+5:302021-04-20T04:41:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: वडजल, ता. फलटण येथे सुरू असलेल्या जुगाड अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: वडजल, ता. फलटण येथे सुरू असलेल्या जुगाड अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोकड असा १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संभाजी साहेबराव चोरमले (वय ४५, रा. बुधवारपेठ, फलटण), गजानन महादेव डोंबाळे (वय ३५, रा. बुधवारपेठ, सातारा), संदीप जगन्नाथ कांबळे (वय ५४, रा. निंभोरे, ता. फलटण), डबलूसिंग विवेकानंद सिंग (वय ३६, रा. निंभोरे, ता. फलटण, मूळ रा.वारसलीगंज, राज्य बिहार), समीर चंदूभाई मारोट (वय ४६, रा.निंभोरे, ता.फलटण, मूळ रा. गांधीनगर, गुजरात), ज्ञानेश्वर रामदास जगताप (वय ४७, रा.अपर इंदिरानगर, पुणे), शरद बाळू खवळे (वय ३०, रा.निंभोरे, ता.फलटण) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजल या गावातील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक सोमवार. दि. १९ रोजी दुपारी कारवाईसाठी पाठवले. गर्जे यांनी जुगार असलेल्या ठिकाणी सापळा लावून त्याठिकाणी येणाऱ्या लोकांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवल्यानंतर त्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची खात्री पटली. पोलिसांनी छापा टाकला असता वरील सर्व संशयित तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल असा १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ही कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विशाल पवार, सचिन ससाणे, विजय सावंत, अर्जुन शिरतोडे आणि राजू ननावरे यांनी भाग घेतला.