कऱ्हाडच्या मध्यवस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 30 जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:19 PM2018-10-21T14:19:06+5:302018-10-21T14:30:34+5:30
मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कऱ्हाड (सातारा) : शहरातील मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरात पालिका इमारतीनजीक सांस्कृतिक भवन आहे. या सांस्कृतिक भवनालगत इतर दुकानगाळे असून, खाली पार्किंगचीही व्यवस्था आहे. संबंधित इमारतीनजीक जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली होती. उपअधीक्षक ढवळे यांनी याबाबतची माहिती विशेष पथकाला देऊन माहितीची खातरजमा करण्याची सूचना दिली. पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, जुगार अड्डा चालविला जात असल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत हा अड्डा चालविण्यात येत होता. त्यामध्ये अनेकजण जुगार खेळण्यासाठी येत होते. रविवारी पहाटे उपअधीक्षक ढवळे यांच्यासह पोलीस पथकाने अचानक त्याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्या काहीजणांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतले. तसेच तेथून दुचाकी, मोबाईलसह सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही युवकांसह प्रतिष्ठितांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. दरम्यान, जुगाराच्या या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यवस्तीत चालविला जाणारा हा अड्डा गत काही दिवसांपासून परिसरात चर्चेचा विषय बनला होता. मात्र, पोलीस कारवाईमुळे हा अड्डा आता उद्ध्वस्त झाला आहे.