विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, चौघे अटकेत; नागठाणेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:26 PM2022-03-02T16:26:55+5:302022-03-02T16:44:25+5:30
दोन दिवसांपूर्वी मुुंबई येथून एका संशयिताला अटक केल्यानंतरच हे प्रकरण अधिकाऱ्यांनी समोर आणले.
सातारा : नागठाणे, ता, सातारा येथील एका ढाब्याच्या पाठीमागे विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून १५० लिटर क्लोरोल हायड्रेडयुक्त बनावट ताडीसह सुमारे ५ लाख ९७ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
सुहास हणमंत साळुंखे, विजय जयसिंग साळुंखे, मिलिंद तुकाराम घाडगे (सर्व रा. नागठाणे, ता, सातारा), राजू व्यंकट नरसय्या भीमानाथिनी (रा. नेवोलीनाका, डोंबविली, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबात माहिती अशी की, नागठाणेतील एका ढाब्याच्या पाठीमागे अवैधरीत्या मानवी शरीरास घातक असा विषारी क्लोरोल हायड्रेट कारखान्यात तयार केला जातो, अशी माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकून बनावट ताडीसह अन्य वस्तू जप्त केल्या. ही कारवाई महिनाभरापूर्वीच करण्यात आली होती.
मात्र, यामध्ये आणखी संशयित आरोपी असल्यामुळे याची उत्पादन शुल्कच्या विभागाने वाच्यता केली नव्हती. दोन दिवसांपूर्वी मुुंबई येथून एका संशयिताला अटक केल्यानंतरच हे प्रकरण अधिकाऱ्यांनी समोर आणले.
या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक के. बी. बिरादार, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम यांनी भाग घेतला.