वाळूसाठ्यांवर छापा; पावणेदोन कोटींचा ऐवज जप्त!
By Admin | Published: December 31, 2015 10:53 PM2015-12-31T22:53:52+5:302015-12-31T23:58:37+5:30
तहसीलदारांची कारवाई : वेणेगावात सुरू होता अवैध उपसा; दोघांविरुद्ध गुन्हा
सातारा : अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांवर वेणेगाव (ता. सातारा) येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा घातला. या छाप्यात तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवराज कमलाकर फडतरे आणि सुंदर कल्याण घाडगे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल आणि प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युवराज फडतरे यांना वेणेगाव येथील कृष्णा नदीमध्ये वाळू भूखंड क्र. १ मंजूर झाला होता; परंतु यांत्रिक बोट वापरण्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे दोन बोटी वापरून वाळूचे उत्खनन केल्यामुळे त्यांच्यावर अपशिंगे येथील मंडलाधिकाऱ्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अवैध उत्खननासाठी वापरलेली यंत्रसामग्री, दोन सक्शन पंप, दोन ट्रक, एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. २०१५-१६ मध्ये सावली अॅग्रो इंजिनिअरिंगतर्फे सुंदर कल्याण घाडगे (रा. कामेरी) यांना वेणेगाव येथील भूखंड क्र. २ येथे कृष्णा नदीतील वाळू उत्खननासाठी लिलाव मंजूर झाला होता. त्यांनी तेथे अनधिकृतपणे पाच बोटी लावून वाळू उत्खनन केले. लिलाव परवानामंजुरीच्या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून विनापरवाना बोटी लावून उत्खनन केल्याच्या कारणावरून घाडगे यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण व नायब तहसीलदार अमर रसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)