फलटणमधील कत्तलखान्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:45+5:302021-04-12T04:36:45+5:30
फलटण : फलटण शहरातील कुरेशीनगर येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर फलटण शहर पाेलिसांच्या पथकाने छापा टाकून ३२ लाख ८३ ...
फलटण : फलटण शहरातील कुरेशीनगर येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर फलटण शहर पाेलिसांच्या पथकाने छापा टाकून ३२ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हवालदार दिग्विजय पांडुरंग सांडगे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ११ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फलटणमधील आखरी रस्ता, कुरेशी नगर येथे जाकीर कुरेशी यांच्या घरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसिफ अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी (सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण) हे अवैधरित्या जनावरांची कत्तल करीत असताना मिळून आले. तसेच ४० वासरे वाहनात भरलेल्या स्थितीत मिळून आली. तर पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तोसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी यांनी तेथून पळ काढला.
या कारवाईत जनावरांचे मांस ६५० किलो, ४० वासरे, एक टेम्पो, कार, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण ३२ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सचिन रावळ, सहायक पोलीस फौजदार शिंदे, हवालदार शिंदे, हवालदार घाटगे, चालक खाडे, हवालदार येळे, चालक करपे, होमगार्ड हिवरकर, गोसावी, जाधव, भिसे यांनी कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन रावळ हे तपास करीत आहेत.
................................................................................................................................................................