भिलवडीसह चार गावांत छापे
By admin | Published: January 8, 2017 11:46 PM2017-01-08T23:46:29+5:302017-01-08T23:46:29+5:30
संशयितांची धरपकड : शंभरजण ताब्यात; मुलीच्या खूनप्रकरणी तपास गतीने
सांगली/भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथे १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रविवारी दिवसभर भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन व खंडोबाचीवाडीत छापे टाकले. शंभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नव्हती.
माळवाडीतील मुलीचा चार दिवसांपूर्वी अत्याचार करून खून केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेचा जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. गावे बंद ठेवली जात आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे तपासासाठी माळवाडीत तळ ठोकून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथकानेही या तपासात उडी घेतली आहे. सध्या चार संशयित ताब्यात आहेत; मात्र त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हे चौघे मृत मुलीची छेड काढत होते. मुलीच्या चुलत भावाने त्यांना समजही दिलीतपासात विविध मुद्दे निर्माण करुन त्यांची चौकशी केली जात आहे.
रविवारी दिवसभर पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी या गावात छापे टाकले. शंभरभर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रत्येक संशयिताचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, घटनेदिवशी तो कुठे होता? याची माहिती घेतली जात आहे. पीडित मुलगी गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर तिला कोणी पाहिले होते का? तिच्यासोबत आणखी कोण होते का? याची माहिती घेतली जात आहे. चौकशीतून जी काही माहिती मिळेल, त्याआधारे तपासाला दिशा दिली जात आहे. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही. परंतु याचा छडा लाऊन संशयितांना अटक करण्यात यश येईल, असे पोलिस सांगत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, निषेध
घटनेच्या निषेधार्थ रविवारी तासगाव, डफळापूर (ता. जत), नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तर कुपवाड येथे संशयितांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
उद्या जिल्हा ‘बंद’चे आवाहन : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उद्या, मंगळवारी जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळून अन्य सर्व घटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खटला जलदगती न्यायालयात : रहाटकर
माळवाडी येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना गंभीर व निंदनीय आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, अशी माहिती विजया रहाटकर यांनी रविवारी सांगलीत दिली.