जिल्ह्यात अवैध दारु अड्डयावर छापे, सहाजणांवर गुन्हा ; दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:18 PM2020-08-24T18:18:03+5:302020-08-24T18:19:43+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला असून ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला असून ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी ढेबेवाडी पोलिसांनी तळमावले, ता. पाटण गावच्या हद्दीत कुंभारगाव रोडवर महालक्ष्मी भांडी स्टोअर्सच्या आडोशाला छापा मारून २ हजार ४०० रुपयांच्या ४७ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तथापि, अवैध दारू विक्री करणारी एक महिला तेथून पसार झाली. तसेच पाटण पोलिसांनी नाटोशी येथे छापा टाकून ५२० रुपयांच्या १० देशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याप्रकरणी नथुराम शिर्के याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर नाटोशीतीलच हणमंत बंडू पाटील याच्या घराजवळल टाकलेल्या छाप्यात ७८० रुपयांच्या १५ देशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हणमंत पाटील वय ६८ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी गोपाळ वस्ती झोपडपट्टी, अजंठा चौक गोडोली येथे छापा टाकून १२४८ रुपयांच्या देशी दारूच्या २० बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी सागर किसन मोहिते (वय २४), हिराबाई निंबाळकर (दोघे रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
धनगरवाडी कोडोली परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ३ हजार ५३६ रुपयांच्या ६८ देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कुसूम नारायण मिरगे वय ६० रा. मातंगवस्ती, धनगरवाडी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.