रेल्वे प्रकल्पबाधित लोकांना नोकरी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:51+5:302021-03-17T04:40:51+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच बाधित कुटुंबातील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, ...
सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच बाधित कुटुंबातील बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
रेल्वे मंत्रालयाच्या मागण्या व अनुदान यावर लोकसभेत चर्चा करताना पुणे-मिरज-लोंढा या मार्गाच्या जमीन अधिग्रहण मोबदल्याचा मुद्दा मांडला. सातारा लोकसभा मतदारसंघातून या रेल्वेमार्गापैकी १०० कि. मी.चा मार्ग जातो. या मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक आहे. परंतु, विस्तारीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्प यांतील प्रत्यक्ष स्थिती व कागदावरील परिस्थिती यात विसंगती आहे. अनेक पात्र शेतकरी मोबदला मिळण्यापासून वंचित राहू शकतील, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यासाठी ९० ते १०० कि.मी. मार्गाची व्यापक संयुक्त पाहणी करणे आवश्यक असून, अधिग्रहण व त्याचा मोबदला निश्चित करण्याची गरज असून, यासाठी पुरेशा निधीची तरतूद करणे आवश्यक असल्याची मागणी केली. या मार्गावर रेल्वे मंत्रालयाने १०० टक्के निधीतून बोरगाव टकले येथे अंडरपास आणि लोणंद येथे ओव्हरब्रीज उभारावा, अशी मागणीही यावेळी केली. याशिवाय ज्या कुटुंबांची जमीन अधिग्रहित केली जाईल, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी, असे भाषणात नमूद केले.