रेल्वे रूळावर; पण प्रवासी खड्ड्यात !

By Admin | Published: March 13, 2015 09:59 PM2015-03-13T21:59:27+5:302015-03-14T00:01:28+5:30

कऱ्हाडचं स्थानक समस्यांनी ग्रासलं : अर्ध्या किलोमीटर अंतरात शेकडो खड्डे; गुडघाभर पाण्यातून काढावा लागतोय मार्ग

On the railway track; But the passage of the passage! | रेल्वे रूळावर; पण प्रवासी खड्ड्यात !

रेल्वे रूळावर; पण प्रवासी खड्ड्यात !

googlenewsNext

विद्यानगर : कऱ्हाड-चिपळूण हा नवा रेल्वे मार्ग सध्या मंजूर झालाय. त्यामुळे कऱ्हाडच्या रेल्वेस्टेशनला महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. रेल्वेसाठी येथे अनेक सोयी-सुविधाही उभारल्या जातायत; पण रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागतेय. स्थानकापर्यंत येण्याचा मार्ग खड्ड्यांनी व्यापला असून, त्यातून मार्ग काढताना प्रवाशांसह वाहनधारक तारेवरची कसरत करतायत.कऱ्हाड-चिपळूण या ११२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला केंद्रीय अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मार्गासाठी १२०० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गामुळे कोकण भाग उर्वरित महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच कऱ्हाडच्या रेल्वेस्टेशनला येत्या काही वर्षांत मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. कऱ्हाड स्टेशन जंक्शन होण्याचीही चिन्हे आहेत; पण या परिस्थितीत येथील रेल्वेस्टेशनला मात्र समस्यांनी ग्रासले आहे. स्टेशनवर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यापासूनच प्रवाशांची कसरत सुरू होते. रेल्वे स्टेशनला जाणारे प्रवासी कऱ्हाडातून भाडेतत्त्वावर रिक्षा करतात. या रिक्षा ओगलेवाडी येथे रेल्वे पुलावरच थांबतात. कऱ्हाडहून येणाऱ्या एस. टी. चा थांबाही याचठिकाणी आहे. पुलावरून प्रवाशांना सुमारे अर्धा किलोमीटरचा पायी प्रवास करून स्टेशन गाठावे लागते. कधी-कधी स्वतंत्र रिक्षा स्टेशनपर्यंत प्रवाशांना पोहोचवतात. मात्र, हे करीत असताना प्रवाशांना अक्षरश: कसरत करावी लागते. रेल्वे पुलापासून स्टेशनवर जाण्यासाठीचा मार्ग खडतर स्वरूपाचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे अथवा गटारचे पाणी नेहमी साचलेले असते. त्यामुळे खड्ड्यांवरून उड्या घेतच प्रवाशांना स्टेशन गाठावे लागते. या मार्गावरच ठिकठिकाणी गोदाम आहेत. त्यामुळे माल वाहतुकीच्या ट्रकचीही मार्गावरून वर्दळ असते. ट्रकमुळे खड्डे दिवसेंदिवस रुंदावत आहेत. परिणामी, रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचला आहे. या रस्त्याने शाळकरी मुले तसेच वृद्धांनाही प्रवास करावा लागतो. चिखल व खड्ड्यांमुळे रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे कठीण बनत आहे.
रेल्वे तिकिटाच्या माध्यमातून येथील स्थानकाला प्रतिमहिना ५० लाख उत्पन्न मिळते. मालधक्क्यातून लोडिंग व अनलोडिंगचे मासिक १५ खेप पूर्ण होतात. त्यांचे सरासरी मासिक उत्पन्न सहा ते सात कोटी रुपये इतके आहे. मात्र, त्या प्रमाणात सोयी-सुविधा नाहीत. परिसरातील नागरिकांनी रस्ता व इतर सोयी सुविधा पुरविण्याबाबत वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, कोणीही लक्ष देत नाही. रेल्वे विभाग या प्रश्नांवर बोलायलाही तयार नाही आणि इतर शासकीय अधिकारी हे आमच्या हद्दीतील काम नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसह इतर सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, हाच प्रश्न आहे. (वार्ताहर)

प्रशासनाबाबत वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आम्हाला कोणताही निर्णय घेता येत नाही. प्रत्येक निर्णयासाठी वरिष्ठांशी संपर्क साधावा लागतो. रस्त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. मात्र, त्याबाबत त्यांच्याकडून कोणताही निर्णय आलेला नाही. त्यांनी निर्णय दिल्यानंतर रस्त्याबाबत कार्यवाही केली जाईल.
- एम. एस. स्वामी, स्टेशन मास्तर


आंदोलनाचा इशारा
रेल्वे स्टेशनवरील मोटार चालक-मालक संघटनेने येथील रस्त्याच्या समस्यांचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनाकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त आश्वासन दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी संघटनेने याबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. त्यावेळी १० मार्चपर्यंत रस्त्याचे काम सुरू होईल, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तरीही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने आता आंदोलनाची तयारी केली जात आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आम्ही वेळोवेळी रेल्वे विभागाला निवेदन दिले आहे. विविध शासकीय खात्यांशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून चालत जाणेही मुश्किल होते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघातही यापूर्वी झाले आहेत. मालाची वाहतूक करणारे ट्रकही या रस्त्यावर अडकल्याची उदाहरणे आहेत.
- धनंजय माने, अध्यक्ष
मोटार चालक-मालक संघटना, कऱ्हाड

Web Title: On the railway track; But the passage of the passage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.