साताऱ्यात पाऊस पुन्हा सक्रीय, ढगांच्या गडगडाटात धो-धो बरसला

By नितीन काळेल | Published: August 17, 2024 06:30 PM2024-08-17T18:30:15+5:302024-08-17T18:30:42+5:30

रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तर सखल भागात पाणी साचले

Rain again in Satara district Power supply cut in many areas | साताऱ्यात पाऊस पुन्हा सक्रीय, ढगांच्या गडगडाटात धो-धो बरसला

साताऱ्यात पाऊस पुन्हा सक्रीय, ढगांच्या गडगडाटात धो-धो बरसला

सातारा : जिल्ह्यात सुट्टी घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात धो-धो पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. तर सातारा शहरात आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. यामुळे सातारकरांना घरातच थांबावे लागले.

जिल्ह्यात जून महिन्यापासून पाऊस सुरू आहे. यामध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच संपूर्ण महिनाभर पाऊस पडत होता. या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते. मात्र, आॅगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील आठवड्यापासून पावसाची विश्रांती होती. कोयना, नवजा, महाबळेश्वर या पावसाच्या भागातही पाऊस पडत नव्हता. पण, शुक्रवारपासून वातावरण बदलले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

माण तालुक्यातील काही भागात शुक्रवारी दमदार पाऊस झाला. यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तर शनिवारीही माणमधील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. तसेच सातारा शहरातही पावसाची उघडीप होती. शनिवारी आठ दिवसानंतर पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर आभाळ भरुन आले. तसेच काळोखी छाया पसरली. त्यानंतर पूर्व बाजुने पावसाचे थेंब पडत येऊ लागले. साडे पाचच्या सुमारास टपोरे थेंब पडू लागले. त्यानंतर पावसाचा जोर वाढतच गेला.

धो-धो पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील वाहतूकही थांबली. तसेच वाहनेही लाईट लाऊन जात होती. या पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले. तर सखल भागात पाणी साचले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झालेले.

नेहमीप्रमाणे विजेचा खेळखंडोबा..

सातारा शहरात यावर्षी पावसाळ्याच्या काळात वीज जाण्याच्या घटना सतत घडत आल्या आहेत. शनिवारीही सायंकाळी पाच नंतर पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली. त्याचवेळी शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतरही वीज आली नव्हती. पाऊस पडू लागला की वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. यामुळे सातारकर नागरिकांतून वीज कंपनीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Rain again in Satara district Power supply cut in many areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.