पावसात छत्री अन् उन्हात माठ!
By admin | Published: March 11, 2015 09:46 PM2015-03-11T21:46:40+5:302015-03-12T00:10:00+5:30
मागणीअभावी दर गडगडले : व्यावसायिकांना विक्रीची चिंता
सातारा : उन्हाळी हंगाम सुरू होताच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा माठ विक्रीवर परिणाम झाला आहे. वातावरणात गारवा असल्याने ग्राहकांनी माठ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजारात मागणीअभावी माठाचे दर कमी करून व्यावसायिक माठांची विक्री करीत आहे.फेबु्रवारी महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो; परंतु याची तीव्रता मार्चपासून अधिक असते. यामुळे हंगामी व्यावसायिक मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात; परंतु यंदा अवकाळी पावसाने दोनवेळा हजेरी लावली आहे. वातावरणातही गारवा जाणवत आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील व्यवसायाना अजूनही ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर यंदा थंडीची लाट ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाणवत होती. त्यामुळे उन्हाची तीव्रता अजूनपर्यंत जाणवत नसल्याने हंगामी व्यावसायिक अडचणीत आले.दरम्यान, सातारा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मातीचे माठ विक्रीसाठी आले आहेत. आकारानुसार १०० ते २५० रुपयांपर्यंत या माठांच्या किमती आहेत. तर काही ठिकाणी चिनीमातीची रंगीत माठ व तोट्या लावलेली माठही विक्रीस आली आहेत. परंतु ग्राहकांअभावी गत वर्षीच्या तुलनेत माठांची विक्री झाली नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.मार्च महिन्याच्या सुरुवातीला ऊन पुन्हा दहा मार्चला अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे वातावरणात गारवा असल्याने माठ खरेदीकडे फारसे कोणी पाहत नाही तर मार्च अखेरचाही परिणाम माठविक्रीवर होत असल्याचे व्यावसायिक सांगत आहे. माठ खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)