पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:17 AM2017-08-15T00:17:47+5:302017-08-15T00:17:51+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन झाले. एवढेच नव्हे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंदही घेतला. फलटण तालुक्यातील कापशी गावात ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू असून तीन वर्षांतून एकदाच श्रावण महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
कापशी गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात असून, अनेक ग्रामस्थ नोकरी व व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहतात. सर्व गावकरी तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात देवाला पावसाचे साकडे घालण्यासाठी गावाच्या सीमेवर एकत्र येतात.
नियोजनानुसार रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची पालखी वाजत-गाजत गावातून मार्गस्थ झाली. सर्व गावकरी पालखीच्या मागून गावच्या सिमेवर असलेल्या अंबाबाई मंदिरात एकत्र आले. लहान मुले, युवक व महिलांसह सुमारे सहाशे गावकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मंदिरात एकत्र आल्यानंतर मानकरी रावसाहेब बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर ‘पाऊस पडू दे.. शेती फुलू दे, गाव सुजलाम-सुफलाम होऊ दे, गावची एकी अखंड राहू दे’ असे साकडे गावकºयांनी देवाला घातले.
हा विधी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वनभोजन केले. जागरण व गोंधळाचा कार्यक्रम व महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवताच्या पालखीसह गावकरी पुुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले.
वनभोजनासाठी धपाटी अन् उसळ
या सोहळ्यात महिलांसह घरातील प्रत्येक सदस्याने सहभाग घेतला. घरातून निघताना प्रत्येकाने सोबत जेवण घेतले होते. पूर्वी जेव्हा हा कार्यक्रम होत असे, तेव्हा गावकरी आपल्या सोबत धपाटी अन् कडधान्याची उसळ आणत असे. अनेक महिलांनी आपल्यासोबत धपाटी अन् उसळ आणून या प्रथेचे दर्शन घडविले.
तिसरे पर्व तीन वर्षांनी
तीन वर्षांतून एकदा श्रावण महिन्यात गावकरी सीमेवरील मंदिरात एकत्र येऊन देवाकडे सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा मध्यंतरीच्या काळात बंद पडली. मात्र, ग्रामस्थांनी २०१४ पासून ती पुन्हा सुरू केली. यंदा या प्रथेचे ५त ि दुसरे पर्व होते. आता २०२० साली हा सोहळा होणार आहे.
सोहळ्यासाठी लोकवर्गणी
कापशी गावात तीन वर्षांतून एकदा या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून केला जातो. गावकरी आपापल्या परिने देणगी देतात. वनभोजनाच्या काही दिवस अगोदर देवाच्या पालखीला निरा स्नान घातले जाते. यासाठी येणार खर्च त्र्यंबक बोबडे यांनी केला.