सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच; कोयनेतून ५२ हजार क्यूसेक विसर्ग; कण्हेरमधूनही वाढ
By नितीन काळेल | Published: September 6, 2024 12:45 PM2024-09-06T12:45:31+5:302024-09-06T12:47:21+5:30
सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ...
सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असून पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतूनही एकूण ५२ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून २४ तासांत नवजाला १०३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पावसाची उघडीप आहे. पण, पश्चिम भागात प्रमाण चांगले आहे. कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे ही धरणे भरल्याच जमा आहेत. त्यातच सततच्या पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ५४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर नवजा येथे १०३ आणि महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासून आतापर्यंतचा विचार करता नवजा येथे सर्वाधिक ६ हजार १९५ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही ५ हजार ८९३ आणि कोयनेला ५ हजार १७३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात सुमारे ३६ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी रात्री ११ पासून सहा दरवाजे साडे पाच फूट उचलून सुमारे ५० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणातून एकूण ५२ हजार ८६ क्यूसेक वेगाने विसर्ग होत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.