सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयना धरणात ८० टीएमसी पाणीसाठा
By नितीन काळेल | Published: August 4, 2023 01:07 PM2023-08-04T13:07:38+5:302023-08-04T13:07:54+5:30
१९ हजार क्यूसेकने आवक : नवजाला ११६ मिलीमीटर पावसाची नोंद
सातारा : पश्चिम भागात पाऊस सुरूच असून कोयना धरणक्षेत्रातही चांगला पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ७९.७० टीएमसी साठा झालेला. तर धरणात १९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. दरम्यान, २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला ११६ मिलीमीटर झाला आहे.
मागील सव्वा महिन्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होत आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी आदी प्रमुख धरणांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झालेला आहे. तर कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ७९.७० टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात १९ हजार २९७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा झालेला आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५० मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ११६ आणि महाबळेश्वरला ४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्याचबराेबर एक जूनपासूनचा विचार करता काेयनेला ३०६० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे ४३६१ आणि महाबळेश्वरला ४०२६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. या तीनही ठिकाणी यंदा चांगला पाऊस झालेला आहे. सध्या पावसाचा जाेर कमी झाला असलातरी दररोज हजेरी आहे. यामुळे पश्चिम भागातील ओढे खळाळून वाहत आहेत.