सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयनेतील विसर्ग बंद

By नितीन काळेल | Published: June 10, 2024 06:34 PM2024-06-10T18:34:24+5:302024-06-10T18:34:35+5:30

खरीप पेरणीला वेग येणार : शेतकऱ्यांकडून खते, बियाण्यांची जुळवाजुळव

Rain continues in Satara district; Discharge in the corner | सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयनेतील विसर्ग बंद

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच; कोयनेतील विसर्ग बंद

सातारा : जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून पाऊस पडत असून खरीप हंगामासाठीही उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. तर कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या १५.२३ टीएमसी साठा आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस कमी झाला. त्यामुळे संपूर्ण लक्ष मान्सूनच्या पावसाकडे होते. त्यातच मागील तीन वर्षांचा इतिहास पाहता मान्सून १० जून नंतरच जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतरही पावसाची दडी होती. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला होता. परिणामी यंदा तरी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने चारा आणि पाण्याची स्थिती बिकट होती. घोटभर पाण्यासाठी ही लोकांना टॅंकरवर अवलंबून रहावे लागत होते. असे असतानाच यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे.

सातारा जिल्ह्यात ६ जूनला मान्सून दाखल झाला. गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. शेकडो गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येतोय. अशातच या भागातही पावसाने दमदार सलामी दिली आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत होता. यामुळे अनेक गावांतील ओढे भरुन वाहिले. तसेच शेतीचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक गावांतील बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी देताना याचा फायदाच होणार आहे.

मान्सूनचा पाऊस वेळेत झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात होणार आहे. त्यातच काही भागात दमदार पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा नाही. त्यामुळे तेथील पेरणी पुढे जाणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीसाठी जोरदार तयारी केली आहे. खते आणि बियाणे दुकानात शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

महाबळेश्वरला १५ मिलीमीटर पाऊस..

जिल्ह्यात रविवारीही पाऊस पडला. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला १५ मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे ३ आणि नवजाला ९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १०२ मिलीमीटर पडलेला आहे.

Web Title: Rain continues in Satara district; Discharge in the corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.