कोयनेचा विसर्ग वाढला; धोममधूनही पाणी सोडले; कृष्णा नदी पातळीत वाढ
By नितीन काळेल | Published: August 1, 2023 12:23 PM2023-08-01T12:23:24+5:302023-08-01T12:36:03+5:30
नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागलाय. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. आता धोममधनूही विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. तर कोयना धरणातील साठा ७४ टीएमसीवर गेल्याने पुन्हा वीजगृहाच्या युनीटमधून विसर्ग सुरु केला. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील एक महिन्यांपासून पाऊस होत आहे. सुरुवातीला जोरदार, त्यानंतर उघडझाप, परत जोरदार असे एक महिन्यात पावसाचे स्वरुप राहिलेले आहे. त्यातच मागील १५ दिवसांत पश्चिमेकडील कोयनेसह नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस पडला. तसेच प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर राहिला. त्यामुळे मोठ्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला.
त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र, कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ७४.२२ टीएमसी झाला होता. तर धरणात २४ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यातच पाऊस सुरू असल्याने कोयना पायथा वीजगृहातील दुसरे युनीटही पुन्हा सुरू करण्यात आले. त्यातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोयना धरण पायथा वीजगृहातून एकूण २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना करण्यात आलेली आहे.
वाई तालुक्यात धोम आणि बलकवडी ही धरणे आहेत. बलकवडीचे पाणी धोममध्ये येते. सध्या या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून बलकवडीतून विसर्ग करण्यात आल्याने धोम धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणाच्या दरवाजातून सोमवारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कृष्णा नदीत जात आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे.
नवजाला १६३ मिलीमीटर पाऊस...
पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस कायम आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची महिन्यानंतरही पावसापासून सुटका झालेली नाही. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस हा नवजाला १६३ मिलीमीटर पडला. यानंतर महाबळेश्वरला १२४ आणि कोयनानगर येथे ९७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.