पाऊस आला धावून... बळीराजा गेला सुखावून!
By admin | Published: September 13, 2015 09:10 PM2015-09-13T21:10:03+5:302015-09-13T22:18:16+5:30
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
खटाव : सातारा जिल्हा हा पावसाळी म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, पाटण, कोयना, बामणोली, नवजा अशी एक नाही अनेक गावांची नावे मुसळधार पावसांच्या यादीत घेतली जातात. या जिल्ह्याच्या पूर्वीचा खटाव मात्र कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी पट्ट्यावर वरुणराजा चांगलाच खूश झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शनिवारी भरपावसात बळीराजाची पावले शेताकडे वळाली आहेत.
खटाव, माण तालुक्यांतील शेतकरी परिस्थितीनं ग्रासला आहे. कितीही नैसर्गिक संकटं आली तरी तो कधीच खचला नाही. पुन्हा जिद्दीनं उभारत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उभा राहत असतो. खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे येरळा नदीला पाणी आले. बळीराजा सुखावला आहे.
पाऊस पडतोय, म्हणून घरात बसून राहणं या बळीराजाला परवडणारं नाही. लहरी पावसाने या पूर्वीच खरीप पिके वाया गेली आहेत. त्यातच थोडीफार हाताला लागणारी पिके काढण्याचे कामात शेतकरीवर्ग व्यस्त असताना मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे या मुसळधार पावसातही बळीराजाने आपली जिद्द न सोडता आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला गाडीला जुंपून शेतात काढलेले पीक सुरक्षितपणे आणण्याची गडबडीत शेतकरीवर्ग दिसून येत होता. प्लास्टिक कागदाचे अच्छादन देऊन काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची देखील गडबड करताना शेतकरी दिसून येत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर बळीराजासह जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट सहज दूर होणार आहे. त्यामुळेच भर पावसात शेतीची कामे करण्यात बळीराजा मग्न आहे. त्याच्या साथ देण्यासाठी सर्जा-राजाही आहेच. (वार्ताहर)
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
मुसळधार पावसामुळे खटावमधील भर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. प्रत्येक वाहनस्वार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होता. मिळेल त्या दुकानात जाऊन थांबत होता. पण, याच वेळी रिपरिप पावसाच्या आवाजात खडखडाटाचा सूर मिसळत एक बैलगाडी धावत सुटली होती. पावसात भिजण्याने आजारी पडण्याची भीती नव्हती की लवकर घर जाण्याची त्यांची धडपड नव्हती. ते निघाले होते काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेताकडे. पावसात भिजण्याचा आनंद बळीराजाप्रमाणेच त्याच्या सर्जा-राजाही झाला होता. कारण बळीराजाच्या ओठावर कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेतील ‘लय दिवसानं, लय नवसानं लागलंय आभाळ गाया... धरणी आईची माया, कशी जाईल वाया,’ या ओळी सहज आल्या होत्या.