Satara: कोयना, नवजाला पावसाची पुन्हा हजेरी; महाबळेश्वरला २० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद 

By नितीन काळेल | Published: June 19, 2024 07:01 PM2024-06-19T19:01:02+5:302024-06-19T19:01:21+5:30

कोयना धरणात किती टीएमसी पाणीसाठा..जाणून घ्या

Rain has started again in the western part of Satara district; Mahabaleshwar recorded 20 mm rainfall  | Satara: कोयना, नवजाला पावसाची पुन्हा हजेरी; महाबळेश्वरला २० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद 

Satara: कोयना, नवजाला पावसाची पुन्हा हजेरी; महाबळेश्वरला २० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाच दिवसांपासून थांबलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २० तर नवजा येथे ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत आले आहेत. सुरूवातीला पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, मागील आठवड्यापासून पश्चिमेकडे पावसाची तुरळक प्रमाणात हजेरी होती. त्यामुळे शेती कामांना वेग आला होता. तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस काेसळला. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच शेत जमिनीतही पाणी साचून राहिले. दुष्काळी तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणीसाठी वापसा येण्याची वाट पाहत आहेत. अशातच आता पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे.

पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळासह कांदाटीखोऱ्यात पावसाने दडी मारली होती. सहा दिवस तुरळक स्वरुपात पाऊस झाला. पण, मंगळवारपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा ओढे, नाले वाहू लागलेत. तसेच भात खाचरातही पाणीसाठा झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ३१ मिलीमीटर झाला आहे. तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजाला ३८५ मिलीमीटर झाला आहे. तसेच कोयना येथे २८३ आणि महाबळेश्वरला २६१ मिलीमीटर पडला आहे.

कोयना धरणात १४.८७ टीएमसी साठा..

कोयना धरणक्षेत्रात पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. पण, अजुनही धरणात पाण्याची आवक सुरू नाही. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १४.८७ टीएमसी पाणीसाठा होता. टक्केवारीत हे प्रमाण १४.१३ इतके आहे. तर गेल्यावर्षी १९ जून रोजी कोयना धरणात ११.११ टीएमसीच साठा होता. तर कोयनेला अवघा ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी पावसाला जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरूवात झालेली.

Web Title: Rain has started again in the western part of Satara district; Mahabaleshwar recorded 20 mm rainfall 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.