सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, कोयना नव्वदीच्या उंबरठ्यावर
By नितीन काळेल | Published: September 19, 2023 12:13 PM2023-09-19T12:13:16+5:302023-09-19T12:15:08+5:30
महाबळेश्वरला ५५ मिलीमीटरची नोंद; यंदा पर्जन्यमान कमीच
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पाऊस सुरू झाला असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण उशिरा का असेना ९० टीएमसीच्या उंबरठ्यावर आले आहे. तर धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आणखी काही दिवस पाऊस पडण्याची गरज आहे.
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला. पण, जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. अनेक धरणे ६० टक्क्यांवर भरली. पण, आॅगस्ट महिन्यात पावसाने निराशा केली. संपूर्ण महिन्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे धरणे काही भरली नाहीत. आता तर सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपलेला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पावसाची तूट कायम आहे. तरीही मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणांत सावकाशपणे पाणीसाठा वाढू लागला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २९ तर नवजाला २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ५३ मिलीमीटर पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५४६३ मिलीमीटर झाला आहे. यानंतर महाबळेश्वरला ५१६३ आणि सर्वात कमी कोयनानगर येथे ३८४३ मिलीमीटर पडला आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे.
आज, सकाळच्या सुमारास ६७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८९.३९ टीएमसी झालेला. टक्केवारीत हे प्रमाण सुमारे ८५ इतके आहे. तर धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १५ टीएमसीवर पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातून होणारा पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
गतवर्षी १०४ टीएमसीवर पाणीसाठा..
गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. पश्चिमेकडेही चार महिने पावसाने हजेरी लावलेली. त्यामुळे धरणेही वेळेत भरली होती. गतवर्षी १९ सप्टेंबरला कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा अजुन ९० टीएमसीचा टप्पाही पार केलेला नाही. तर गतवर्षी आतापर्यंत कोयनेला ४४३४ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर नवजाला ५३९० आणि महाबळेश्वरला ५७९० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती.