सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

By नितीन काळेल | Published: September 26, 2024 07:09 PM2024-09-26T19:09:31+5:302024-09-26T19:10:10+5:30

वीर, कण्हेर अन् उरमोडीतूनही पाणी सोडले, पिकांचे नुकसान  

rain in Satara district; A record of 133 mm to Navja, Re discharge from Koyna Dam | सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; नवजाला १३३ मिलिमीटरची नोंद, कोयनेतून पुन्हा विसर्ग

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून पूर्व दुष्काळी भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पश्चिमेकडेही जोरदार हजेरी असून २४ तासांत नवजाला १३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्यातच पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीसदृश्य पाऊस हाेत आहे. यामुळे ओढ्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड तालुक्यातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजाला १३३ आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील या पावसामुळे प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे सायंकाळी पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा होता. ९८.४६ इतकी पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

नदीकाठावरील रहिवाशांना इशारा..

सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. यामुळे गुरूवारी पहाटेपासून धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग वाढविण्यात आला. सकाळी सहाच्या सुमारास १४ हजार ७६१ क्यूसेक विसर्ग सुरू होता. सातारा तालुक्यातील कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे या नीरा, वेण्णा आणि उरमोडी नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Web Title: rain in Satara district; A record of 133 mm to Navja, Re discharge from Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.