सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ११६ मिलीमीटर नोंद
By नितीन काळेल | Published: July 18, 2024 06:45 PM2024-07-18T18:45:11+5:302024-07-18T18:45:43+5:30
कोयनेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक, पाणीसाठ्यात वाढ
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांच्या उघडझापनंतर पावसाने पुन्हा दमदार सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ११६ मिलीमीटरची नोंद झाली. तर या पावसामुळे काेयनेत येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे धरण पाणीसाठा ४४ टीएमसीवर पोहोचला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीच्यावर आहे. या धरणावर अनेक गावांच्या पाणी तसेच सिंचन योजनाही अवलंबून आहेत. यासाठी ही धरणे महत्वाची ठरतात. तसेच याच पश्चिम भागात आणखी काही छोटी धरणे आहेत. सध्या छोटी धरणे भरु लागली आहेत. मात्र, मोठी धरणे भरण्यासाठी संततधार पावसाची आवश्यकता आहे. त्यातच आतापर्यंतच्या दीड महिन्यात पावसाची उघडझाप होत असल्याने धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही.
चार दिवसांपूर्वी तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झालेला. त्यानंतर उघडझाप सुरू होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस होत असल्याने साठा वाढू लागला आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८६ मिलीमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत २ हजार ८७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजाला ११६ तर आतापर्यंत २ हजार ४५४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
महाबळेश्वरमध्ये यंदा पश्चिम भागात पर्जन्यमान कमी
महाबळेश्वरमध्ये यंदा पश्चिम भागात पर्जन्यमान कमी आहे. २४ तासांत महाबळेश्वरला ७१ तर आतापर्यंत १ हजार ८७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणक्षेत्रातही बुधवारपासून पाऊस वाढला आहे. त्यामुळे आवक वाढून ११ हजार क्यूसेकवर गेली आहे. गुरूवारी सकाळी धरणात ४४.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २४ तासांत सुमारे एक टीएमसीने साठा वाढला आहे.