पाऊस लांबला... तलाव आटला !
By admin | Published: June 20, 2017 04:09 PM2017-06-20T16:09:57+5:302017-06-20T16:09:57+5:30
कासचा साठा पाच फुटांवर : पावसाळ्यात पाणीटंचाईचे सावट
आॅनलाईन लोकमत
पेट्री (सातारा ) , दि. २0 : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. अजूनही मान्सून दाखल होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईची समस्या गडद होऊ लागली आहे. सद्यस्थितीला तलावात केवळ पाच फुट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात चार ते साडेचार फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यास तलावावर आणखी दोन इंजिन बसवून पाणी उपसून पाटात सोडावे लागणार आहे.
कास तलावात किनाऱ्यालगत २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी ३ जुलैला तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. पावसाळ्याला सुरूवात होऊन पावसाचे मृग नक्षत्र संपत आले तरी देखील यंदा मान्सून दाखल होण्याचे संकेत अजुनही दिसत नसल्याने आजमितीला तलावातील पाणी पातळी साडेपाच फुटांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एका फुटाने पाणीसाठा कमी आहे.
आत्तापर्यंत सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला एक इंच पाणी पातळी कमी होत होती. परंतु तलावातील पाण्याचे पात्र कमी कमी होत चालल्याने दर दिवशी दीड इंचाने पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. हा पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत टिकून राहावा यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी रात्रंदिवस दोन इंजिनच्या साह्याने उपसा करून पाटात सोडले जात आहे.
मागील महिन्यात दोन वेळा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने तसेच गेल्या दोन दिवसांपासून कास परिसरात तुरळक पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. यामूळे मान्सूनचे लवकर आगमन होण्याची चिन्हे दिसत होती. परंतू सध्या मान्सूनचा जोर दिसत नसल्याने पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे.
सध्या तलावात पाच फुट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. पाऊस वेळेवर न आल्यास सातारकरांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे
- जयराम किर्दत,
पाटकरी कास तलाव