पावसाळ्यात पाणी; उन्हाळ्यात ठणठणाट!
By admin | Published: December 17, 2014 09:26 PM2014-12-17T21:26:14+5:302014-12-17T23:04:01+5:30
घोलपवाडी तलाव : गळतीमुळे पाणी जातेय वाया
मसूर : घोलपवाडी, ता. कराड येथे गावच्या पूर्वेस असणाऱ्या व घोलपवाडी, निगडी, हणबरवाडी या आरफळ कॅनॉलच्या पूर्वेच्या गावांना वरदान असणाऱ्या एक नंबर पाझर तलावाच्या व्हॉल्व्हची गळती काढावी; अन्यथा येथे ‘यमाई डॅम’ पद्धतीचा दुसराच पाझर तलाव बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
हा पाझर तलाव हा १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी रोजगार हमी योजनेत तयार केला होता. तलावाची मधली भिंत सोडून दोन्ही बाजूने तयार करण्यात आला होता. त्यावेळी त्याला रोलिंग केलेले नाही. तसेच पाणी अडवण्याची मधली भिंत १९९४-१९९५ सालच्या दरम्यान तत्कालीन शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधीर जोशी यांनी या तलावाची पाहणी करून त्यावेळी हिवाळी अधिवेशनात या तलावाचा तारांकित प्रश्न उपस्थित करून याला मंजुरी मिळविली व त्यावेळेसच मधली भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले.
या कामाला पिचिंग व रोलिंग मिळाले असल्याने ते काम मजबूत झाले आहे; परंतु पूर्वी दोन्ही बाजूंला पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या मोठ्या बांधांना रोलिंग झाले नाही. त्यामुळे या पाझर तलावातून व व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. हा तलाव यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला होता; परंतु आता या तलावात चाळीस टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे या गावची परिस्थिती ‘पावसाळ्यात पाणीच पाणी व उन्हाळ्यात ठणठणाट,’ अशीच होत आहे. या तलावात चर काढून व्हॉल्व्हची पाणी गळती काढण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडे अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी केली. या विभागाचे उपअभियंता भंडारे यांनीही ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाठपुरावा केला; परंतु याला निधी मिळत नसल्यामुळे काम होत नसल्याचे त्यांनीही ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी या विभागात पूर्वी होत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्या होत असलेल्या संयुक्त प्रभाग सभांपैकी एक सभा या तलावातच घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही यश आले नाही. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या गावाला पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)
निगडी व घोलपवाडी दरम्यान येथील पाणीप्रश्न संपुष्टात यावा म्हणून शासनाच्या वतीने ओढ्यावर सुमारे १५ ते २० पृथ्वी बंधारे बांधले आहेत; परंतु या एक नंबरच्या पाझर तलावातील पाणी आटून तो कोरडा पडल्यास या बंधाऱ्यातही पाणी राहणार नाही. व सगळीकडेच ठणठणाट होणार आहे. तेव्हा शासनाने या तलावाची पहाणी करून येथे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा तलाव बांधावा व कायमचा पाणीप्रश्न मिटवावा.
- बंडा घोलप, घोलपवाडी,
शिवसेना प्रमुख कोपर्डे विभाग
1 डॅम बांधण्याची मागणी एखाद्या गावात अशा प्रकारे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी शासनाने परवानगी दिली तर त्याठिकाणी जमीन संपादित करण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु या गावात आहे. याच तलावाच्या ठिकाणी नवीन तलाव मंजूर केल्यास गावचा, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
2 डोंगर कुशीत वसलेल्या या गावाला पाणी मिळावे, म्हणून शासनाने ठोस उपाययोजना करून याठिकाणी यमाई पद्धतीचा डॅम बांधावा, अशी मागणी जोर धरत आहे.
3 नवीन यमाई पद्धतीचा डॅम झाल्यास तो पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहील, त्यामुळे मसूरच्या पूर्वेची घोलपवाडी, निगडी , हणबरवाडी या गावांची सुमारे दोन हजार एकर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येईल.