पावसाने काढलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:03 PM2019-11-06T18:03:16+5:302019-11-06T18:07:45+5:30
सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे.
सागर गुजर
सातारा : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी भलतेच पेचात सापडले आहेत. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गाळप योग्य असणारा २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस साठलेल्या पाण्यात तरंगत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने कारखान्याला ऊस केव्हा जाणार ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये गाळप योग्य उसाचे ८० हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने नजरअंदाजे याचे अनुमान काढले आहे. अजून पंचनामे चालू आहेत, त्यामुळे नंतर तोडणीयोग्य झालेल्या उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान लक्षात येणार आहे. उसाच्या आधारावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने काही उसंत दिलेली नाही. ऊस तोडणीची लगबग दोन कारणाने थांबलेली आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळाले नाहीत.
दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मिळवण्यासाठी सप्टेंबर महिन्यातच साखर आयुक्तांना प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने या प्रस्तावांना मंजुरी मिळालेले नाही. जरी गाळपाचे परवाने मिळाले असते तरी कोसळत्या पावसात शेतामधून कारखान्याला ऊस देणे सोपे नव्हते.
साहजिकच मंत्री समितीची बैठक होऊन जरी परवाने मिळाले असते तरी ऊस वाहतुकीमध्ये किंवा ऊस तोडणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाच असता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा उसाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. गतवर्षी उसाची लागवड घटल्याने मार्चअखेरपर्यंत हंगाम संपला. यात वाढ ऊसक्षेत्र असते तर कदाचित जून महिनाही यासाठी लागला असता, असा अंदाज साखर कारखानदार व्यक्त करतात.
उसाचा गाळप हंगाम साधारणत: चौदा ते पंधरा महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र तो १४ ते १७ महिन्यांपर्यंत चालेल, अशी शक्यता आहे. उशिरा पक्व होणाऱ्या उसाला १४ ते १७ महिन्यांत तोडला तरी कुठलाही तोटा नसतो; परंतु १२ ते १५ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या उसाला तेवढ्याच कालावधीत तोडणे गरजेचे असते, अन्यथा उशिरा तोड झाली तर उसाच्या वजनात घट येते. साखर उत्पादनातही घट येते. त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या रिकव्हरीवर प्रतिकूल असा होतो. साहजिकच उशिरा पक्व होणाऱ्या उसाचे चांगले वजन वाढले तर लवकर पक्व होणारा ऊस वजनात घटेल, अशी परिस्थिती आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ऊसतोडीसाठी अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ या भागातून ऊस मजूर येतात. यंदा त्या भागातही उसाचे उत्पादन घटले असल्याने जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना मजुरांचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या त्यांच्या भागात रब्बीच्या पेरणीमध्ये हे मजूर गुंतलेले आहेत. या पेरण्या संपल्या की मजुरांच्या टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल होतील.
शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य
पावसाने अद्याप उसंत दिलेली नाही. ऊसतोडीची वेळ आली, तरीदेखील पाऊस पडत असल्याने शेतातल्या वाटांवर चिखलाचे साम्राज्य आहे. या परिस्थितीमध्ये शेतातून ऊस बाहेर कसा काढायचा, हाही प्रश्न सतावत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आधीच पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस पावसाच्या पाण्यात पडल्याने उसाचे डोळे फुटले. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. सगळ्या उपलब्ध असलेल्या उसाची तोड केली जाणार आहे.
- एस. एन. दळवी
कार्यकारी संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे बुद्र्रुक, कऱ्हाड