पश्चिम भागात पावसाची उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:36+5:302021-06-23T04:25:36+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस नसला तरी पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १८, महाबळेश्वर ...
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस नसला तरी पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १८, महाबळेश्वर येथे २४ आणि नवजाला २५ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयना धरणात ४१ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात माॅन्सूनचा पाऊस सुरुवातीपासून पडत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने काही काळ दडी मारली. पण, गेल्या आठवड्यापासून पश्चिम भागात पाऊस पडत आहे. या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तसेच प्रमुख धरण परिसरातही पावसाचा जोर राहिला. त्यामुळे धरणांतही चांगला पाणीसाठा होऊ लागला आहे. आतापर्यंत तारळी, कण्हेर, धोम, बलकवडी, उरमोडी या धरणांत चांगला पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर कोयना धरणातही साठा वाढीस मदत झाली आहे.
कोयना धरणात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९ तर जून महिन्यापासून ८१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे २५ व यावर्षी आतापर्यंत ९२० मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला २४ व आतापर्यंत १०२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आठ दिवसांत १० टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चौकट :
साताऱ्यात ऊन अन् ढगाळ वातावरण...
सातारा शहरात मागील चार दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला. सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला. पण, सोमवारपासून विश्रांती घेतली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत कधी ऊन जाणवायचे. तर काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत होते. दरम्यान, पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.