पाऊस सैराट अन् नद्या-नाले सुसाट..!
By admin | Published: July 12, 2016 11:33 PM2016-07-12T23:33:54+5:302016-07-13T00:46:41+5:30
कऱ्हाड, पाटण तालुक्यात हाहाकार : उरूल, ठोमसे, पोतले, आणेत पूल पाण्याखाली; मराठवाडी, महिंद धरण भरले; घरांची पडझड
कऱ्हाड/मल्हारपेठ/सणबूर : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात धुवाधार पाऊस सुरूच असून कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांसह वांग, दक्षिण मांड, केरा, मोरणा, तारळी, काफना या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओढ्यांनाही पूरस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कऱ्हाड तालुक्यातील पोतले, आणे व पाटण तालुक्यातील ऊरूल, ठोमसे येथील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढेबेवाडी खोऱ्यातील मराठवाडी व महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
गत चार दिवसांपासून कऱ्हाड व पाटण तालुक्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. सोमवारी दिवसभरात अनेक फरशी पुलांना पाणी घासत होते. मात्र, रात्री उशिरा पाण्याची पातळी आणखी वाढल्याने हे पूल पाण्याखाली गेले. कऱ्हाड तालुक्यातील वांग नदीवरील पोतले व आणे येथील फरशी पूल सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेला. त्यामुळे आणे, येणके, किरपे या गावांचा कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाशी संपर्क तुटला आहे. तसेच पाटण तालुक्यातील उरूल व ठोमसे येथील पूलही पाण्याखाली गेले आहेत. मल्हारपेठ विभागात गत चार दिवसांपासून पावसाचा जोर आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने सुरुवात केली. त्यामुळे उरूल, ठोमसे येथे असणाऱ्या ओढ्याला पूर येऊन दोन्ही साकव पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला आहे. उरूल, ठोमसे, बोडकेवाडी या तीनही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे साकव पूल आहेत. नेहमीच पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या गावापासून दूर आहेत. त्यामुळे पूर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. उरूल, ठोमसे येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या फणशीच्या ओढ्याला पूर आल्यामुळे दरवर्षी या पुलांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, ढेबेवाडी विभागामध्ये गत चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. तसेच डोंगरावरून वाहत येणारे पाणी गावातील ओढ्यात मिसळत असून, काही ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. विभागातील मराठवाडी व महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे येथील वांग नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच याच रस्त्यावरील ढेबेवाडी बसस्थानकानजीकचा फरशी पूलही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद झाली आहे. परिसरातील अनेक गावांतील ओढे नाल्यांना मोठे पाणी आले आहे. त्यामुळे काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी ढेबेवाडीचा आठवडी बाजार होता. मात्र, पावसामुळे बाजारात विक्रेत्यांसह खरेदीदारांची संख्या कमी होती. बाजारतळावर अक्षरश: शुकशुकाट जाणवत होता. तसेच मंद्रुळकोळे खुर्द येथील मुख्य रस्ता पावसामुळे तुटल्याने परिसरातील वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
काढणे, ता. पाटण येथील वांग नदीवरील पुलाचा भराव जोराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे काढणे, तुपेवाडी, बागलवाडी यासह अन्य काही गावांचा संपर्क तुटला आहे. अंबवडे खुर्द येथील ज्ञानदेव गणपती नांगरे यांच्या घराची भिंत कोसळल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
भात पीक पाण्याखाली
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शिवारातच तळे निर्माण झाले असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मलकापूरसह, कापिल गोळेश्वर, पाचवड, आटके, नारायणवाडी येथे भाताचे पीक पाण्याखाली गेले आहे.
वीज पंपाने पाणी काढण्याचा उद्योग
कऱ्हाड शहरातील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोल पंप चौकापर्यंत अनेक दुकान गाळ्यांमध्ये गटाराचे पाणी शिरले आहे. गटार तुंबल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, दुकानगाळ्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी व्यावसायिक वीज पंपाचा वापर करीत आहेत. या पाण्यामुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.