सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; कोयनेत ६४ टीएमसीवर साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:38 PM2022-07-27T13:38:39+5:302022-07-27T13:40:30+5:30
धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरुच
सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी असली तरी पश्चिम भागातही आता उघडीप आहे. बुधवारी सकाळपर्यंत नवजाला १२ आणि महाबळेश्वर येथे १० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा ६४ टीएमसीवर पोहोचला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जुलै महिना सुरु झाल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सलग १५ दिवस जोरदार पाऊस झाला. पण, मागील आठवड्यापासून पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. सध्यातर पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्यासारखी स्थिती आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे काहीच पाऊस झाला नाही. मात्र, नवजाला १२ आणि महाबळेश्वरमध्ये १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून कोयनेला २२३०, नवजामध्ये २८५८ आणि महाबळेश्वर येथे २९९२ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
दरम्यान, कोयना धरणक्षेत्रात पाऊस अत्यल्प आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात ५,५१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६४.२५ टीएमसी झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण ६१.०४ इतके आहे. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरुच होता.