दहिवडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:22 PM2020-05-14T17:22:48+5:302020-05-14T17:24:50+5:30
दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक वृक्ष उन्मळून पडले. नगरपंचायत कार्यालयासमोरही अनेक झाडे मोडून पडली.
दहिवडी : दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक वृक्ष उन्मळून पडले. नगरपंचायत कार्यालयासमोरही अनेक झाडे मोडून पडली.
माण तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वातावरणात उकाडा जाणवत असल्याने दहिवडी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच बुधवारी रात्री अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. सोसाट्याचे वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे दहिवडीच्या मुख्य चौकात लिंबाची डहाळी वीजवाहक तारेवर पडल्याने तारा तुटल्या. याशिवाय खांबही मोडल्याने दहिवडीतील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. काही ठिकाणी रस्त्यावरही झाडे पडल्याचे चित्र होते. या पावसाने शेतातील कांदा पिकाला मोठा तडाखा बसला. तर कडवळ, मका भुईसपाट झाली होती.
वातावरणात रात्रभर गारवा होता. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी सर्व झाडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
तारा अनेक दुकानच्या समोरच पडल्याने भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. फलटण चौकात सगळीकडेच झाडे पडले होते. दिवसभर झाडे हटवण्यासाठी वीजवितरण कंपनी, बांधकाम विभाग, नगरपंचायतीचे कर्मचारी परिश्रम घेत होते.