पाचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस : लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:50+5:302021-04-12T04:36:50+5:30
मायणी : खटाव तालुक्यातील पाचवड येथे शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये एकाचे कुक्कुट पालनासाठी बांधलेल्या शेडचे लाखो रुपयांचे ...
मायणी : खटाव तालुक्यातील पाचवड येथे शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये एकाचे कुक्कुट पालनासाठी बांधलेल्या शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आनंदाची बाब म्हणजे श्रमदानातून तयार करण्यात आलेल्या पाणलोटच्या कामांमध्येही मोठा पाणीसाठा निर्माण झाला आहे. याचा शेतीसाठी फायदा होऊ शकतो.
खटाव तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये पाचवड गाव आहे. या गाव आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वादळ झाले. या वादळामध्ये किरण भीमराव घाडगे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी बांधलेल्या शेडचे सिमेंट पोल तुटून भिंत ही पडली. त्यामुळे शेडवरील सर्व पत्रेही जमिनीवर कोसळले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, ग्रामस्थांनी श्रमदानातून येथील भवानी माता डोंगरावर पाणलोटची कामे मार्गी लावली आहेत. तसेच संपूर्ण वर्षभरात शेकडो सीसीटी बंधारे बांधले आहेत. यावर्षीही मोठ्या प्रमाणात पाणलोटाचे काम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे या पाणलोटच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे.
त्यामुळे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे.
फोटो ओळ : पाचवड, ता. खटाव येथे वादळी वाऱ्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी बांधलेल्या शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (छाया : संदीप कुंभार)