पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:12 PM2019-09-25T14:12:26+5:302019-09-25T14:13:23+5:30
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोपर्डे हवेली : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कऱ्हाड तालुक्यात कोपर्डे हवेली गाव आहे. येथे कृष्णा नदीलगत पांढर शिवाराकडे जाणारा पुईचा पूल आहे. या पुलावरुन नडशी, वहागाव आदी गावांकडे जाता येते. कोपर्डे हवेली, नडशी या गावांतील शेतीसह इतर वाहनांची ये-जा या पुलावरुन होत असते. वाहतुकीच्यादृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पूल तयार करण्यात आला होता.
कोपर्डे हवेलीतील ५० टक्के शेतकऱ्यांच्या शिवाराची भिस्त या पुलावरील वाहतुकीवर अवलंबून आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पावसामुळे या पुलाला छोटीशी भेग पडलेली. मात्र, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ट्रॅक्टर पुलावरुन जात असताना पुलाचा मधला भाग खचला.
दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी दुसऱ्या रस्त्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची फुगी या पुलापर्यंत येत असते. त्यामुळे पुईचा ओढा असे त्याला नाव पडले आहे.
कोपर्डे हवेलीतील या पुलाची दुरुस्ती लवकर होणे गरजेचे आहे. उसासह इतर वाहतूक या पुलावरुनच होत असते. पूल ढासळल्याने ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ऊस गळीत हंगाम जवळ आल्याने पुलाची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच सततची होणारी वाहतूक व वापर पाहता पुलाची मजबुती वाढवणे गरजेचे आहे.
- गुरूदत्त चव्हाण,
शेतकरी कोपर्डे हवेली