जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना वीजगृहातून विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 02:15 PM2021-08-05T14:15:17+5:302021-08-05T14:18:11+5:30
Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पडणाऱ्या पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ६४, नवजा ८१ तर महाबळेश्वरला ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयनेतील साठा ८७ टीएमसीवर असून पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे. तसेच जिल्ह्यातील इतर काही धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील १५ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, बामणोली आणि महाबळेश्वर भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीपर्यंत पोहोचला. तर कोयनेतच २४ तासांत १६ टीएमसीवर पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही झाला होता. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.
सुरुवातीला धरणाचे सर्व सहा दरवाजे दहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला. त्यामधून ५० हजार क्यूसेकवर वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. तसा विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला.
बुधवारी सकाळच्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे दरवाजातील विसर्ग बंद झाला आहे. मात्र, पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला. गुरुवारीही वीजगृहातून विसर्ग सुरुच होता.
गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २२७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३३४२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ८१ आणि जूनपासून आतापर्यंत ४२६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४३४९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा
धोम धरणातून नदी आणि बोगद्याद्वारे मिळून ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता. बलकवडी धरणातून १७४० तर तारळीतून १८९९ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, कण्हेर, उरमोडी या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या धोम, कण्हेर, कोयना, उरमोडी, बलकवडी आणि तारळी या धरणांत गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.