नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:25 PM2020-09-08T15:25:48+5:302020-09-08T15:28:24+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.
जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला असलातरी त्याचे प्रमाण अनिश्चित राहिले आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला. पण, जुलैमध्ये प्रमाण कमी राहिले होते. तर आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस कोसळला. विशेष करुन पश्चिम भागात काही दिवस मुसळधार पाऊस झाला.
तसेच कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी या धरण परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही दिवसांतच धरणांमधील साठा वेगाने वाढला. परिणामी धरणे भरु लागल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. सध्या सर्वच धरणे भरु लागली आहेत. तर तारळी धरण १०० टक्के भरले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरलाच २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर यावर्षी आतापर्यंत महाबळेश्वरला ४७७३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर कोयनेला आतापर्यंत ४१९६ आणि नवजा येथे ४८०९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
कोयना धरणात हळू हळू पाण्याची आवक होत आहे. धरणात १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच दुष्काळी तालुक्यातही पावसाची उघडीप आहे.