अतिवृष्टीचा १३२ पाणी योजनांना फटका, सव्वा लाख नागरिक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:08 PM2019-08-17T16:08:55+5:302019-08-17T16:12:57+5:30
पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. सध्या बाधित असणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक नागरिकांना टँकर, विहिरी, हातपंपाचाच आधार उरलाय.
सातारा : पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. सध्या बाधित असणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक नागरिकांना टँकर, विहिरी, हातपंपाचाच आधार उरलाय.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटपासून पावसाचा जोर राहिला तो आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होता. पश्चिम भागात तर पावसाने कहर केला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या अतिवृष्टीमुळे रस्ते, घरे, शाळा, अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृृष्टीचा फटका पाणी योजनांनाही बसलाय.
पाटण, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील पाणी योजनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक पाणी योजना या पाटण तालुक्यातील ८६ आहेत. तर इतर तालुक्यातीलही योजनांना याचा फटका बसला आहे. यामुळे ९२ हजार ६४८ नागरिक बाधीत आहेत. या लोकांना आड, वहिरीतील पाण्याचा आधार राहिलाय. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील २३ योजनांनाही फटका बसला आहे. त्यामुळे १२ हजार ६४७ नागरिकांवर पाणी शोधण्याची वेळ आली आहे.
या अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने विहिरीत गाळ जाणे, पाईपलाईनचे नुकसान, मोटार वाहून जाणे, वीज खांब पडणे अशा नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील १३२ पाणी योजनांसाठी जवळपास ३ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यानंतरच ग्रामस्थांना पाणी योजनांचे पाणी मिळणार आहे. सध्या पाणी योजना नसणारे ग्रामस्थ हातपंप, विहिरी, टँकरचे पाणी पित आहेत.
नुकसानीची माहिती अशी
तालुका नुकसान योजनांची संख्या बाधित लोकसंख्या अंदाजे खर्च
पाटण - ८६ ९२६४८ १ कोटी ९४ लाख
महाबळेश्वर- २३ १२६४७ १ कोटी २१ लाख ५० हजार
जावळी - १ ४२६ ५ लाख
खंडाळा - ३ १४२६ ७ लाख ४३ हजार
कऱ्हाड - १९ २२१३६ ३६ लाख ४४ हजार