Satara: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला!, पंधरा ते वीस दिवसांनंतर सूर्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:33 PM2023-08-07T12:33:00+5:302023-08-07T12:33:17+5:30

पाणीसाठा ८१.७१ टीएमसीवर, पर्यटकांची वर्दळ वाढली

Rainfall in Koyna dam area decreased, after fifteen to twenty days of Suryadarshan | Satara: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला!, पंधरा ते वीस दिवसांनंतर सूर्यदर्शन

Satara: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला!, पंधरा ते वीस दिवसांनंतर सूर्यदर्शन

googlenewsNext

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. अधूनमधून होणारा शिडकावा वगळता दिवसभर पावसाने हजेरी लावली नाही. त्यातच गत पंधरा ते वीस दिवसांनंतर रविवारी प्रथमच सूर्यदर्शन झाले. कडक ऊन पडल्यामुळे येथील जनजीवन सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातील पाण्याची आवकही कमालीची घटली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत धरणात ८१.७१ एवढा पाणीसाठा झाला असून, धरण ७७.६३ टक्के भरले आहे. तर पाण्याची आवक १० हजार ७२२ क्युसेक एवढी होती. कोयनेसह परिसरात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू होता. जुलैच्या सुरुवातीला धरणात अत्यल्प पाणीसाठा होता.

मात्र, जोरदार पावसाला सुरुवात होताच धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी, झपाट्याने साठाही वाढला. धरण व्यवस्थापनाने जलसूचीच्या निकषाप्रमाणे पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सुरुवातीला पायथा वीजगृहातील एक युनिट सुरू करून विसर्ग सुरू केला. तर नंतर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे दुसरे युनिट सुरू करून विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळीही कमालीची वाढली.

धरण ८० टीएमसीपेक्षा जास्त भरलेले असताना संततधार पाऊस सुरूच राहिल्यास वक्र दरवाजे उघडून विसर्ग केला जाण्याची शक्यता होती. मात्र, रविवारपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. दिवसभरात पावसाची हलकीशी सर वगळता पाऊसच झाला नाही. त्यातच गत अनेक दिवसांतून प्रथमच या विभागात सूर्यदर्शन झाले. दुपारच्यावेळी कडक ऊन पडल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवला.

पर्यटकांची वर्दळ वाढली...

पावसाने उघडीप दिल्यामुळे तसेच रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांनी कोयनेसह परिसरातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटकांची वर्दळीमुळे गुहाघर-विजयपूर महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकही सुखावून गेले. दिवसभर पाऊस न पडल्यामुळे पर्यटकांनाही पर्यटनस्थळांवर निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता आला.

Web Title: Rainfall in Koyna dam area decreased, after fifteen to twenty days of Suryadarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.